दुर्दैवी ! जन्माला आली गोंडस ‘परी’ अन् आई गेली ‘देवाघरी’

नंदुरबार । गर्भवती मातेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मातेने गोंडस मुलीला जन्म दिला. प्रसूतीनंतर रक्तदाब अचानक कमी झाल्याने शुद्ध हरपलेल्या मातेला नशिबी आलेल्या छोट्याशा ‘परीरूपी’ कन्येचा चेहरा पाहताही आला नाही. २४ तासांच्या उपचारानंतर मातेचा मृत्यू झाल्याची घटना नंदुरबामध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गायत्री अमोल पाटील (वय २८) असे मयत मातेचे नाव आहे. नंदुरबार तालुक्यातील सावळदा येथील माहेर आणि पातोंडा येथील सासर असलेल्या गायत्री यांनी दि. १८ ऑक्टोबर रोजी नंदुरबारातील एका खासगी रुग्णालयात कन्यारत्नाला जन्म दिला होता.

जन्माला आलेली कन्या गोंडस आणि गुबगुबीत असल्याने तिला हातात घेणाऱ्या कुटुंबीयांनी ‘परी’ जन्माला आली असे गायत्री यांना सांगितले होते. परंतु प्रसूतीदरम्यान रक्तदाब कमी झाल्याने गायत्री यांची प्रसूतीनंतर शुद्ध हरपली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना दि. १९ रोजी रक्तदाब कमी झाल्याने मातेचा मृत्यू झाला.

दि. १९ रोजी वाढदिवस असलेल्या दिवशी गायत्री पाटील यांनी जगाचा निरोप घेतल्याने कुटुंबीयांच्या अश्रुधारा अविरत सुरू होत्या. जन्माला आलेल्या कन्येला स्पर्श किंवा तिला न पाहताच गायत्री यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश रुग्णालयात सुरू होता. मयत मातेवर पातोंडा येथे अंत्यविधी करण्यात आले.

गायत्रीचे शिक्षण प्रकाशा येथील सर्वोदय विद्यामंदिर विद्यालयात झाले होते. दीड वर्षांपूर्वीच पातोंडा येथील अमोल पाटील यांच्यासोबत विवाह झाला होता. विवाहपश्चात पहिल्याच बाळंतपणादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रसूतीदरम्यान रक्तदाब कमी झाल्यानंतर पुन्हा तो सामान्य न झाल्याने मातेचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.