ब्रेकिंग! कुबेरेश्वर धाममध्ये जळगावच्या तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Kubereshwar Dham : मध्यप्रदेशातील सिहोर येथील कुबेश्वर धाम येथे 16 फेब्रुवारीपासून सात दिवसीय रुद्राक्ष महोत्सव सुरू झाला आहे. मात्र कार्यक्रमापूर्वीच आठ लाखांहून अधिक भाविक सिहोरमध्ये पोहोचले असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. आज शुक्रवारी जळगावच्या एका तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रानुसार समोर आली आहे. या महोत्सवादरम्यान, महाराष्ट्रातील एका महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला होता, त्यानंतर आज शुक्रवारी एक महिला आणि जळगावच्या तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला असून एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 73 जण आजारी पडल्याची माहिती सूत्रानुसार मिळते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुबेश्‍वर धाम रुद्राक्ष महोत्सवात जळगावचे विवेक विनोद भट्ट गुरुवारी पत्नी आणि दोन मुलांसह गेले होते. याचदरम्यान, त्यांचा 3 वर्षांचा मुलगा अमोघ भट्टची तब्येत बिघडली, चालताना तो अधिकच आजारी पडला, जिथे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, आज शुक्रवारी सकाळी डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं. दरम्यान, अमोघ भट या बालकाचा दफनविधी सीहोरमध्येच करण्यात आला असल्याचे मृत बालकाचे वडील विवेक भट यांनी सांगितले.

रुद्राक्ष वाटप बंद
कुबेरेश्वर धाममध्ये पंडित प्रदीप मिश्रा शिवकथा सांगण्याबरोबरच आमंत्रित रुद्राक्षाचे वाटप करणार होते. परंतु अनियंत्रित गर्दी पाहता काल गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून रुद्राक्ष वाटप बंद करण्यात आले आहे. आज म्हणजेच शुक्रवारी रुद्राक्ष वाटपाच्या दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रानुसार समोर आली आहे.