चिमुकल्यांना सांभाळा, उष्माघाताने पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात वाढ होऊ लागली असतानाच काही ठिकाणी पारा चाळीशी पार गेला आहे. वाढत्या तापमानामुळे एप्रिल महिन्यापासूनच नागरिकांना उन्हाचे जबर चटके बसू लागले आहेत. अशातच हिंगोलीत उष्माघाताने एका चिमुकलीचा बळी घेतला आहे. कण्हेरगाव नाका येथील नंदिनी शंकर खंदारे या पाच वर्षांच्या मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती वाशिम येथील एका खासगी डॉक्टरांनी पालकांना दिली आहे.

कण्हेरगाव नाका येथील शंकर खंदारे यांच्या मुलीला अचानक ताप आणि उलटी जुलाब सुरु झाल्याने गावापासून जवळ असलेल्या वाशिम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात नंदिनीवर उपचार सुरु होते. मात्र उपचारादम्यानच नंदिनीची प्राणज्योत मालवली. नंदिनीच्या मृत्यूनंतर गावावर शोककळी पसरली आहे.

राज्यातील वातावरणात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदलताना दिसत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वार्‍यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. असे असतानाच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होतानाही दिसत आहे. अनेक ठिकाणी तापमान चाळीशी पार गेले आहे. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.