नवी मुंबई : खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये आतापर्यंत 13 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक श्री सदस्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हृदयविकाराच्या समस्या आणि रक्तातील साखरेच्या पातळीतील चढउतार यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी काही रुग्ण गंभीर आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले आप्पासाहेब धर्माधिकारी?
या घटनेबाबत आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. आप्पासाहेबांनी परिपत्रकाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, शासानाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सारे श्री सदस्य हे माझ्या कुंटुबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे.
‘माझ्या कुटूंबातील सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित झालो आहे. माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबीयांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची पंरपरा आहे. त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत.’, असे आप्पासाहेबांनी यावेळी सांगितले.
तसेच, ‘या घटनेतील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटुंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. झाला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे.’ असे सांगत आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी या घटनेचे राजकारण करु नका अशी विनंती केली आहे.