नागपूर : भाजपाचे हेवीवेट नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे तीन फोन आले असून त्यानंतर त्यांच्या कार्यालयातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणा प्रचंड सतर्क झाल्या असून तपास यंत्रणादेखील कामाला लागल्या आहेत. याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आली नसली तरी गडकरींची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी त्यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन आले. सकाळी ११.२९ वाजता पहिला फोन आला. त्यानंतर आणखी दोन फोन आले. एक फोन ११.३५ वाजता तर तिसरा फोन हा १२.३२ वाजता आला. हा प्रकार झाल्यावर तेथील कर्मचार्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलीस कार्यालयात दाखल झाले असून तपास सुरू आहे. आज संध्याकाळी गडकरी यांचे नागपुरात कार्यक्रम आहेत. तर राष्ट्रीय पातळीवरील रस्ता सुरक्षा मोहिमेची आज सुरुवात करण्यात आली आहे.