कर्जाचा डोंगर : जमीनही विकली, तरी.. वडलीतील दाम्पत्यानं मुलासह संपवलं जीवन

जळगाव : कर्जाचा डोंगर वाढत गेल्यानंतर 25 एकर शेतजमीन विकण्याची वेळ आली मात्र त्यानंतरही कर्ज कायम राहिल्याने त्यातून आलेल्या नैराश्याने खचलेल्या दाम्पत्यासह मुलाने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील वडली येथे गुरुवारी सकाळी 10 वाजता उघडकीस आली. या घटनेत पित्याचा मृत्यू ओढवला असून मुलगा आणि आईची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

शेतजमीन कर्जामुळे विकली मात्र कर्जाचा डोंगर कायम
जळगाव तालुक्यातील वडली गावात नारायण दंगल पाटील (66) हे पत्नी भारती नारायण पाटील (55) व मुलगा गणेश नारायण पाटील (35) याच्यासोबत वास्तव्याला होते. त्यांचा एक मुलगा नाशिक येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. या कुटुंबावर कर्ज झाल्यानंतर त्यातून त्यांनी अलीकडेच शेतजमीन विकली व त्यांनी कर्ज फेडले मात्र त्यानंतर कर्ज मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहिल्याने कुटुंबाला नैराश्याने ग्रासले व त्यातून पाटील कुटुंबिय तणावात होते.

एकाच वेळी तिघांचे विष प्राशन
गुरूवार, 6 एप्रिल रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान नारायण पाटील, त्यांची पत्नी भारती पाटील आणि मुलगा गणेश पाटील यांनी तिघांनी घरात असतांना विषारी औषध सेवन केले. त्यानंतर अत्यवस्थ वाटू लागल्याने गणेशने गावात राहणारा मित्र श्यामला फोन करून घरी येणाचे सांगितले. त्यानुसार श्याम हा घरी गेल्यावर आई-वडीलांसह मुलगा गणेश हे तिघे गळ्यात गळा टाकलेल्या अवस्थेत दिसून आले. श्यामने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तिघांना खाजगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. तिघांपैकी नारायण दंगल पाटील यांचा उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी 10 मृत्यू झाला तर त्यांची पत्नी भारती आणि मुलगा गणेश या दोघांची प्रकृती गंभीर आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील ग्रामस्थ व नातेवाईकांनी जिल्हा शासकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जावून माहिती जाणून घेतली.