नवी दिल्ली : देशाच्या राजधानीतील 70 जागांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालांकडे लागले असून, सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप), भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या राजकीय भविष्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’ पक्षाने विकासाच्या मुद्यांवर जोर दिला, तर भाजपाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर भर दिला आहे. भाजपाला मागील 27 वर्षांपासून दिल्लीच्या सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. त्यामुळे यंदा हा सत्तेचा दुष्काळ संपतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दिल्लीतील काँग्रेस पक्ष गेल्या काही निवडणुकांपासून संघर्ष करत असून, या निवडणुकीत पक्षाच्या पुनरागमनाची फारशी शक्यता व्यक्त केली जात नाही. माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निधनानंतर पक्ष नेतृत्व संकटात सापडले आहे.
दिल्लीकर कोणाच्या बाजूने?
दिल्लीकर मतदारांनी पुन्हा एकदा केजरीवाल सरकारला संधी दिली आहे का, की भाजपाने आपल्या प्रभावी प्रचाराने निवडणूक जिंकली आहे, हे निकालानंतर स्पष्ट होईल. राष्ट्रीय राजकारणावरही या निकालांचा मोठा परिणाम होणार आहे.
दरम्यान, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, भाजप ४६, आप २६ आणि काँग्रेस ०१ जागांवर आघाडीवर आहे. तर कालकाजी मतदारसंघात मतमोजणीच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत, यामध्ये भाजपचे रमेश बिधुरी १६३५ मतांनी आघाडीवर आहेत, तर भाजप ४२ जागांवर पुढे आहे, आप २८ जागांवर आघाडीवर आहे.