नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित करण्यात आले नसले तरी, नव्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या तयारीला वेग आला आहे. २० फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानात सायंकाळी ४:३० वाजता हा भव्यदिव्य शपथविधी पार पडणार आहे. या सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी पक्षाचे महासचिव विनोद तावडे आणि तरुण चूग यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
शपथविधीपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सत्तेत असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची एक विशेष बैठक होणार आहे. त्यानंतर हे सर्व नेते शपथविधी कार्यक्रमाला हजर राहतील. या ऐतिहासिक सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, रालोआचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री तसेच नामवंत उद्योगपती, बॉलिवूड कलाकार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि संत-महात्मे उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कोण?
प्रवेश वर्मा – त्यांनी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे, त्यामुळे त्यांचे वजन अधिक वाढले आहे.
विजेंद्र गुप्ता – दिल्ली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष असून पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाचा त्यांना पाठिंबा आहे.
सतीश उपाध्याय – ते देखील भाजपचे जुने आणि अनुभवी नेते असून, त्यांच्या नावावर विचार होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपने राजस्थान, हरयाणा, मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड येथे प्रस्थापित नेत्यांऐवजी नवे चेहरे मुख्यमंत्री म्हणून संधी दिली. त्यामुळे दिल्लीतही हाच पॅटर्न राहणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
निर्णयाची प्रतीक्षा; बुधवारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक
दिल्ली भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक १९ फेब्रुवारी रोजी होणार असून, यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी नेत्याची निवड केली जाणार आहे. यासाठी पक्षाने दोन निरीक्षक नियुक्त केले आहेत. त्यांच्याच शिफारशीनुसार अंतिम निर्णय घेतला जाईल. २० फेब्रुवारीच्या शपथविधीनंतर दिल्लीत नवीन सरकार कार्यभार स्वीकारेल. भाजपकडून मोठ्या आशा आणि जबाबदाऱ्या असलेल्या या नव्या नेतृत्वाकडून दिल्लीकरांना काय मिळणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.