Delivery Boy Murder । नुकताच लॉन्च झालेल्या ‘आयफोन 16’ खरेदीसाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत ग्राहकांच्या रांगा लागल्याचे दोन दिवसांपूर्वी दिसून आले होते. मात्र, आता याच आयफोनसाठी चक्क डिलिव्हरी बॉयची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
‘आयफोन 16’ अॅपलचा हा सर्वात लेटेस्ट फोन आहे. यामध्ये अनेक नवीन फिचर अॅपलने जोडले आहे. हा फोन खरेदीसाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत ग्राहकांच्या रांगा लागल्याचे दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर दिसून आले होते. मात्र, याच आयफोनसाठी चक्क डिलिव्हरी बॉयची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ऑनलाईन आयफोन मागवून डिलिव्हरी बॉयची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये ही घटना घडली आहे. चिन्हाट येथील रहिवासी असलेल्या गजाननने कॅश ऑन डिलिव्हरी अंतर्गत फ्लिपकार्टवरून दीड लाख रुपयांचा आयफोन ऑर्डर केला होता. निशातगंज येथील रहिवासी असलेला भरत साहू डिलिव्हरीसाठी मुख्य आरोपी गजाननच्या घरी पोहोचला तेव्हा त्याच्या एका मित्राने त्याला घरात बोलावून त्याचा गळा दाबून खून केला.
हत्या केल्यानंतर दोघांनी भरतचा मृतदेह गोणीत भरून इंदिरा कालव्यात फेकून दिला. यानंतर आरोपींनी डिलिव्हरी बॉयच्या उरलेल्या ग्राहकांच्या डिलिव्हरी स्वत: पोहोचवल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, याप्रकरणी सध्या पोलिसांनी गजाननचा मित्र आकाशला ताब्यात घेतले आहे. पोलीस गजाननचा शोध घेत आहेत.