भिवंडी : तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यवसायासाठी व्याजावर घेतलेल्या रकमेवर वाढीव व्याज देऊ न शकल्याने कर्जदारांनी चक्क पत्नीकडून शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप असून, या प्रकाराने त्रस्त होऊन कामिल शेख नामक व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी त्यांनी मोबाईल कॅमेरात व्हिडिओ तयार करून आपली व्यथा मांडली आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
आत्महत्येपूर्वी मोबाईल व्हिडिओद्वारे केले गंभीर आरोप
भिवंडी तालुक्यातील महापोली येथे राहणारे कामिल शेख हे साबणाच्या फॅक्टरीत काम करत होते. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी अमान नसीम भावे, बहुद्दीन उर्फ मुन्ना यासीन अन्सारी, आणि रेहमान कादीर कोतकर यांच्याकडून चार ते पाच लाख रुपये व्याजाने घेतले होते. वेळेवर व्याजाचे पैसे परत करत असूनही तिघांनी त्यांच्याकडे उरलेल्या रकमेवर अवास्तव व्याजाची मागणी केली.
हेही वाचा : अरेरे! बायकोने नवऱ्याला लावला चुना; किडनी विकायला लावली अन्… वाचाल तर थक्क व्हाल
या तगाद्यामुळे कामिल शेख यांना सातत्याने मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यातच, व्याजाच्या रकमेऐवजी पत्नीकडून शरीरसुखाची मागणी केल्याने त्यांचा संताप अनावर झाला. या अवहेलनेला कंटाळून त्यांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, एक जेरबंद तर दोन फरार
या घटनेनंतर गणेशपुरी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बहुद्दीन उर्फ मुन्ना यासीन अन्सारी यास अटक केली असून, अमान नसीम भावे आणि रेहमान कादीर कोतकर हे अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत आहेत.
सोशल मीडियावर संतापाची लाट
कामिल शेख यांनी मृत्यूपूर्वी तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यात त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती दिली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. गणेशपुरी पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.