तिकीटासाठी काँग्रेस नेत्यांची पक्ष कार्यालयासमोर निदर्शने

बंगळुरु : पुढच्या महिन्यात कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठी काँग्रेसमध्ये मोठी गटबाजी दिसून येत आहे. दरम्यान तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांनी समर्थकांसह बंगळुरू येथील पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने केली. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मोठ्या संख्येने नेते आणि कार्यकर्ते हातात बोर्ड घेऊन कार्यालयाबाहेर निदर्शने करताना दिसत आहेत.

याबाबत बोलताना कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सलीम अहमद म्हणाले की, पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे. उद्या पक्षाची महत्वाची बैठक होणार आहे आणि यातच आम्ही तिकीट वाटपावर चर्चा करुन अंतिम निर्णय घेऊ. आम्ही सर्वे केलाय, जो जो सर्वोत्तम असेल त्याला तिकीट मिळेल.

भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, राज्यात विधानसभा निवडणूक १० मे रोजी एकाच टप्प्यात घेतली जाईल आणि १३ मे रोजी निकाल जाहीर होतील. २२४ जागांपैकी सध्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे ११९ आमदार आहेत, तर काँग्रेसकडे ७५ आणि जनता दल (सेक्युलर) कडे २८ जागा आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ : महत्त्वाच्या तारखा
– अधिसूचना जारी करणे: १३ एप्रिल २०२३
– नामांकन करण्याची शेवटची तारीख: २० एप्रिल २०२३
– नामांकनांची छाननी: २१ एप्रिल २०२३
– उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख: २४ एप्रिल २०२३
– मतदान १० मे २०२३
– निकाल १३ मे २०२३