तरुण भारत लाईव्ह । जळगाव : दरवर्षी राज्यात व जिल्ह्यात शासन व जिल्हा परिषदेतर्फे शिक्षकांना शिक्षक दिनी शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. मात्र कोट्यवधींचे बजेट असलेल्या जळगाव शहर महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळातील शाळांचे शिक्षण गेल्या 10 वर्षांपासून शिक्षक पुरस्कारांपासून वंचित राहत आहेत. याबाबत शिक्षण मंडळासह महापौर, आयुक्त, विरोधी पक्ष नेत्यांना कोणतेही सोयरसुतक नसल्याचा आरोप होत आहे, मात्र मनपा शाळेचे शिक्षक मात्र दरवर्षी या दिवसाकडे डोळे लावून बसलेले असतात.
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणून एके काळी जळगाव नगरपालिकेचा नावलौकिक होता. मात्र नंतरच्या काळात सर्वात जास्त कर्जबाजारी पालिका व महापालिका म्हणूनही नावलौकिक झालेला आहे. दरम्यान, राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर महापालिका हुडकोच्या कर्जातून मुक्त झाली. त्यामुळे शहरात विविध विकास कामांचा धडाका सुरू होईल, अशी सामान्यांची असलेली अपेक्षा आता फोल ठरली आहे. महापालिका कर्जबाजारी असो वा नसो मात्र दरवर्षाच्या बजेटमध्ये मात्र कोटींची उड्डाणे आकड्यात दाखवली जात आहेत. त्यामुळे जळगावकरांसह महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शिक्षकांना मोठी अपेक्षा लागून राहली आहे.
महापालिकेच्या शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी महापालिकेच्या शाळांतील शिक्षकांना आजच्या 5 सप्टेंबर शिक्षक दिनी ‘शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात येत होते. तत्कालीन सभापती प्रा. जीवन खिंवसरा हे यासाठी प्रयत्न करत. त्यांच्या कार्यकाळात मनपाच्या अनेक शाळांतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
शिक्षण मंडळाची उदासीनता
मात्र गेल्या 10 वर्षापूर्वी शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी शिक्षक पुरस्कारासाठी महापालिका प्रशासनाकडे निधीची मागणी केली होती, परंतु मनपा शाळांतील शिक्षकांना पुरस्कार देण्यासाठी पुरेसा निधी नसल्याचे कारण देत महापालिकेने हा प्रस्ताव फेटाळला. हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर मात्र शिक्षण मंडळाने तेव्हापासून तर आजपर्यत महापालिका प्रशासनाला पुरस्कारासाठी निधी देण्याबाबतचा प्रस्तावच पाठविला नाही. त्यामुळे शिक्षकांकडून शैक्षणिक कामाशिवाय इतर कामे करून घेण्यातच शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी धन्यता मानत असल्याची चर्चाही शिक्षकांम्धून व्यक्त होत आहे.
23 शाळांमध्ये आहेत 140 शिक्षक
मनपा शिक्षण मंडळात प्राथमिक 23 शाळा आहेत. त्यात 140 शिक्षक अध्यापनाचे कार्य करत आहेत. गेल्या 10 वर्षात यातील एकाही शिक्षकांना ना महापालिकेने शिक्षक पुरस्कार दिला, ना कोणत्याही सामाजिक संस्थेने.
मनपात ‘महिला राज’ तरीही शिक्षक वंचितच
महापालिकेतील उच्च शिक्षण आयुक्त, महापौर, उपायुक्त या महिला आहेत, तर विरोधी पक्ष नेतेही त्यांच्या खासगी शिक्षण संस्थेचे संचालक आहेत. असे असताना मनपाच्या शिक्षकांना या वर्षाचा शिक्षक दिन तरी गोड होईल असे वाटत होते. मात्र ही अपेक्षाही फेल ठरली आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांना निधी
याबाबत शिक्षण मंडळाशी संपर्क साधला असता शिक्षक पुरस्कारासाठी मनपा प्रशासन निधी देत नाही. मात्र सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धांना निधी देत असल्याचे सांगण्यात आले. जर या दोन्ही उपक्रमांना मनपा निधी देत असेल तर शिक्षक पुरस्कारासाठी निधी देण्यास का टाळाटाळ करत आहे याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.
प्रशासन अधिकारीही प्रभारी
दरम्यान, महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या महिला प्रशासन अधिकारी या प्रभारी आहेत. त्यांची नियुक्ती ही जिल्हा परिषदेत असून त्यांच्याकडे चार विभागांचा प्रभारी पदभार असल्याचे कळाले. चार विभागाचा कार्यभार पाहत असताना प्रभारी महिला प्रशासन अधिकाऱ्यांची बैठकीनिमित्ताने सतत धावपळ होत असल्याने त्या मनपाच्या कार्यालयीन वेळेत भेटतीलच याची शाश्वती नसते. दरम्यान, याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.