---Advertisement---
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाआधी मानद डॉक्टर ही उपाधी लागणार आहे. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण, सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याबद्दल गौरव करण्यासाठी जपानच्या ‘कोयासन विद्यापीठा’तर्फे त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केले जाणार आहे. दि. २६ डिसेंबर रोजी मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा सोहळा रंगणार आहे.
कोयासन विद्यापीठाने १२० वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला असून, ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान केली जाणार आहे. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही मानद डॉक्टरेट त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
कोयासन विद्यापीठाचे प्रो. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित असतील. २०१५ मध्ये देवेंद्र फडणवीस हे जपान दौर्यावर गेले तेव्हा कोयासन विद्यापीठात त्यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्यानंतर २०१८ आणि २०२३ मध्ये त्यांनी जपानला भेट दिली होती. अलीकडे ऑगस्टमध्ये जपान दौर्यावर ते गेले असता कोयासन विद्यापीठाने यासंबंधीची घोषणा केली होती.