अग्रलेख
आपल्याकडे हा फार जुना वाक्प्रचार आहे. चकाकते ते सगळेच सोने नसते. पण, जे चकाकते ते सोनेच असते असे आपण मानत असल्याने फसगत होते. आपल्या आसपास दररोज अनेक घटना घडत असतात. वर्तमानपत्रांत त्याच्या बातम्याही येत असतात. लोकप्रबोधन हा वर्तमानपत्रांचा प्रमुख उद्देश आहे. तो मात्र सफल होताना दिसत नाही. कारण, प्रकाशित होणा-या बातम्या लोक फक्त करमणुकीसाठीच वाचतात, हे घडणा-या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. बातम्या वाचून लोकांनी सतर्क व्हावे आणि स्वत:ची फसगत होऊ नये याची काळजी घ्यावी, हा बातम्या प्रकाशित करण्यामागचा उद्देश असतो. हे सगळे याठिकाणी नमूद करण्याचे कारण आहे. गेल्या काही दिवसांत ज्या बातम्या प्रकाशित होत आहेत, त्या चिंता करायला लावणा-या आहेत. अशा बातम्या गेल्या काही दिवसांतच प्रकाशित झाल्या आहेत, असे नव्हे तर सातत्याने प्रकाशित होत आहेत.
आपल्यापैकी प्रत्येकाला असे वाटत असते की, आपण विदेशात गेलो पाहिजे. विशेषत: मुलीचे जे आईवडील असतात, त्यांना आपली मुलगी विदेशात जावी असे मनापासून वाटत असते. सगळ्याच पालकांना असे वाटते, असे आम्हाला म्हणायचे नाही. पण, अनेक पालकांना हा विदेशात जाण्याचा सन्मार्ग वाटत असतो. विदेशात नोकरी करणारा मुलगा शोधायचा, आयुष्यभर कमावलेला पैसा खर्च करून एनआरआय मुलाशी लग्न लावून द्यायचे अन् मुलीच्या सुखी संसाराचे स्वप्न पाहायचे, यात गैर काहीच नाही. पण, एनआरआय मुलाशी लग्न लावून दिल्यानंतर मुलगी सुखातच राहील, याची कसलीही खात्री देता येत नाही. महाराष्ट्रातली जी मुलं विदेशात नोकरी करीत आहेत, त्यांच्याकडून फसवणूक झाल्याचे प्रकार तुलनेने कमी आहेत, पण, पंजाब, गुुजरात, हरयाणा या राज्यांमधील मुलांकडून असे फसवणुकीचे प्रकार घडतात. अशा प्रकरणांच्या बातम्या भयचकित करणा-या आहेत.
दर आठ तासांनी एक एनआरआय महिला भारतात आपल्या माहेरी फोन करून घरी सुरक्षित येण्याबाबत इच्छा व्यक्त करते. एनआरआय पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. एनआरआय पतीकडून केवळ शारीरिक आणि मानसिक त्रासच दिला जातो असे नव्हे, तर अनेकदा बेवारस सोडून दिले जाते. यापैकी अनेक महिलांची स्थिती एवढी वाईट होते की, त्यांना इतरांनी मायदेशी परतण्यासाठी आर्थिक मदत केली तरी त्या परतू शकत नाहीत. कारण, त्यांचा पासपोर्ट आणि व्हिसा त्रास देणा-या पतीने फाडून टाकलेला असतो.शिवाय, भारतातून परदेशात गेलेल्या या नवविवाहिता मुलींपैकी अनेकींना स्थानिक कायद्यांची जाण नसते, तिथल्या पद्धती माहिती नसतात, परकीय भूमी असल्याने तिथली भाषा येत नसते, भाषा येत नसल्याने कुणाशी कसा संवाद साधायचा हा प्रश्नच असतो. अशा सगळ्या समस्यांनी घेरली गेलेली नवविवाहिता अतिशय हतबल होते आणि कुटुंबापासून दूर परदेशात अतिशय बिकट परिस्थितीत सापडते.
मुलगा परदेशात नोकरी करतो एवढ्या एका माहितीवर मुलीचा विवाह त्याच्याशी करून देणे घातक ठरू शकते. परदेशात असलेल्या मुलाचे भारतात राहात असलेले कुटुंबीय जरी चांंगले असले, तरी परदेशात गेलेला मुलगा तिकडे कोणती नोकरी करतो, त्याच्या कामाचे स्वरूप काय आहे, त्याला वेतन किती मिळते, त्याची वर्तणूूक कशी आहे, तिकडे त्याचे कुण्या परदेशी मुलीशी अफेअर तर नाही ना, त्याला कुठली व्यसनं तर नाहीत ना, या व अशा प्रकारच्या सर्व बाबी तपशीलवार तपासल्यानंतरच पालकांनी आपल्या मुलीच्या विवाहाबाबतचा निर्णय घेतला पाहिजे. भारतात आपण आपल्या पाल्यांचे विवाह लावून देताना ज्या प्रकारची काळजी घेतो, नातेवाईकांकडे, ओळखीच्यांकडे चौकशी करतो, सगळे रीतीरिवाज पाळतो, त्या प्रकारची संपूर्ण काळजी मुलगी विदेशात पाठवतानाही घ्यायला नको का? पण, इथेच पालक चूक करतात. आपली मुलगी परदेशात जाणार, तिला आणि तिच्यासोबत मग आपल्यालाही एक वेगळे स्टेटस प्राप्त होणार, या लालसेने कुठल्याही प्रकारची चौकशी न करता मुलीचे लग्न लावूून देतात.
लग्नात वारेमाप खर्च करतात, मुलाला मोठ्या प्रमाणात भेटवस्तू देतात अन् मुलीची पाठवणी करतात. परदेशातल्या मुुलाशी मुलीचे लग्न लावून दिले म्हणजे तिला कसलीही काळजी राहणार नाही, पैसाअडका तिच्याकडे भरपूर राहील, पुढे आपल्यालाही परदेशात जाता येईल, या आशेने पालक बेधडक आपल्या मुलीचा विवाह अगदीच अनोळखी असलेल्या एनआरआय तरुणाशी लावून देतात. स्वत: निश्चिंत होतात. भविष्यात काय घडणार आहे, याची त्यांना जराही कल्पना नसते. अतिशय आनंदात दिवस चालले असतानाच अचानक वाईट वार्ता कानी पडते आणि होत्याचे नव्हते होऊन जाते. एखादं परदेशातलं स्थळ आलं की, पालकांना संधी गमवावीशी वाटत नाही. पुन्हा दुसरं असं स्थळ येईल की नाही, या अस्वस्थतेतून मग घाईने निर्णय केला जातो. जी मुलं परदेशी जातात, ती अनेकदा तिकडचीच होऊन जातात. पण, कुठेतरी आईवडिलांबाबत त्यांच्या मनात एक जागा असते. आईवडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केले आहे, शिकवून परदेशी पाठविले आहे, याची जाणीव होऊन ते आईवडिलांना खूश करण्यासाठी म्हणून मायदेशी घरी येतात. आईवडील दु:खी होऊ नये म्हणून त्यांनी पसंत केलेल्या मुलीशी स्वत:च्या इच्छेविरुद्ध लग्न करतात अन् पत्नीला घेऊन परदेशी चालले जातात.
अशी मुलं मग पत्नीला सर्व प्रकारचा त्रास देतात. म्हणून जोपर्यंत मुलगा मुलीला मनापासून पसंती देत नाही, तोपर्यंत मुलीच्या पालकांनी तपशीलवार चौकशी करून मगच अंतिम निर्णय केला पाहिजे. महाराष्ट्रातल्या पालकांनी हे सगळे वाचून घाबरण्याचे कारण नाही. कारण, या संकटात सापडलेल्या मुलींना मदत करणारे कार्यकर्ते आणि वकील यांचे म्हणणे असे आहे की, आंध्रप्रदेश तेलंगणा पंजाब आणि गुजरात या राज्यांमधील मुली जास्त प्रभावित आहेत. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातही ही बाब पुढे आली आहे. असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातील पालकांंनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. दर आठ तासाला एक तक्रार प्राप्त होते, हा अधिकृत आकडा आहे. पण, अनेक मुली दूतावासांकडे तक्रारी करीत नाहीत. त्यामुळे फसगत झालेल्या तरुणींची संख्या आणखी जास्त असू शकते. असा प्रकार आपल्या मुलीबाबत घडू नये, याची पालकांनीच काळजी घ्यायची आहे.
सगळं काही प्रारब्धावर सोडून चालणार नाही. आपणही प्रयत्न करायला हवेत. मुलीला विदेशात पाठविण्याचे स्वप्न पालकांनी पाहणे गैर नाही. आपली स्वप्नं मुलींवर लादून चालायचे नाही. एकीकडे प्रारब्धावर विश्वास ठेवायचा आणि दुसरीकडे आपली स्वप्नं मुलीवर लादायची, हा तर स्वार्थीपणा आणि दुटप्पीपणाच म्हटला पाहिजे. विदेशात संकटात सापडल्यास मदत कुणाला मागायची, नेमके काय करायचे, याबाबतचे मार्गदर्शन अशा तरुणींना केले जाणे आवश्यक ठरते. भारतीय दूतावासांनीही अशा प्रकरणांमध्ये जराही वेळ न दवडता आणि कायद्याचा किस न पाडता अशा तरुणींना तत्काळ मदत उपलब्ध करून दिली पाहिजे. आवश्यकता असेल तर भारत सरकारनेही कायद्यात बदल करून अडचणीत सापडणा-या भारतीय तरुणींचे भवितव्य सुरक्षित केले पाहिजे. शेवटी पुन्हा एक गोष्ट याठिकाणी नमूद करणे आवश्यक वाटते आणि ती म्हणजे पालकांनी स्वत:ची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुलींवर आपल्या इच्छा लादू नयेत!