जळगाव : जामनेर येथे आज (रविवार) कुस्तीचा थरार रंगणार असून, महाराष्ट्र केसरी विजेते पुरुष व महिला मल्लांसह देशविदेशातील नामवंत पहिलवान ‘देवाभाऊ केसरी’ किताबासाठी जोरदार झुंज देणार आहेत. सकाळी ११ वाजता या स्पर्धेचे भव्य उद्घाटन पार पडले असून, देशभरातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीगीर यात सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मल्ल जामनेरला दाखल होत आहेत. स्पर्धेत एकूण २२ प्रमुख लढतींसह तब्बल ३०० कुस्त्या रंगणार असून, गेल्या तीन वर्षांचे महाराष्ट्र केसरी विजेते पृथ्वीराज मोहोळ, शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख यांच्यासह उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड आणि तीन वेळचा महाराष्ट्र केसरी विजय चौधरी हे नामांकित पहिलवान यात सहभागी होत आहेत. याशिवाय, विदेशी पहिलवानांनाही मैदानात उतरून आपले कसब पणाला लावण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेचे आयोजन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असून, स्पर्धेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. मंत्री महाजन यांनी शनिवारी मैदानाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. या भव्य स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऑलिम्पिक पदक विजेता रवी कुमार दहिया, ऑलिम्पियन नरसिंग यादव, तसेच कॉमनवेल्थ विजेता राहुल आवारे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, भारतासह तब्बल नऊ देशांचे नामांकित पहिलवान या कुस्ती दंगलसाठी जामनेरमध्ये दाखल होत आहेत. फ्रान्स, उझबेकिस्तान, रोमानिया, इराण, ब्राझील आणि जॉर्जिया या देशांतील ऑलिम्पिक विजेते तसेच अर्जुन पुरस्कार विजेते, हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी विजेते या स्पर्धेत भाग घेत आहेत.
कुस्तीप्रेमींसाठी सर्वाधिक उत्सुकतेचा विषय म्हणजे, पृथ्वीराज मोहोळ आणि इराणच्या जलाल म्हजोयूब यांच्यात होणारी लढत. याशिवाय, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड आणि रोमानियाचा युरोपियन विजेता फ्लोरिन ट्रिपोन यांच्यातील सामना चुरशीचा ठरणार आहे. तसेच, शिवराज राक्षे देखील आपली ताकद आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे.
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह अनेक महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी विजेते आंतरराष्ट्रीय पहिलवानांना मात देण्यासाठी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहेत. जामनेरच्या मातीवर रंगणाऱ्या या भव्य कुस्ती महोत्सवाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, कुस्तीप्रेमींना थरारक कुस्ती लढतींचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे.