विकसित भारत संकल्प यात्रा; धुळे जिल्ह्यात जनजागृती

धुळे : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेले मात्र अद्याप ज्यांना लाभ मिळू न शकलेल्या पात्रताधारक व्यक्तिंपर्यंत केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ पोहोचावा म्हणून केंद्र शासनातर्फे धुळे जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयेाजन करण्यात आले आहे. त्यानुसार आज शिंदखेडा तालुक्यातील कंदाणे,चिरणे,दरखेडा व निशाणे या ग्रामपंचायतीमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा उत्साहान संपन्न झाली.

विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे केंद्र शासनाच्या योजना नागरिकांच्या दारापर्यंत पोहचविण्यात येत आहेत. या यात्रेत ग्रामीण भागात आयुष्मान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, किसान क्रेडीट कार्ड, प्रधानमंत्री पोषण अभियान, हर घर जल-जलजीवन मिशन, जन धन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, नमो फर्टीलायझर या 17 योजनांबाबत माहिती देण्यासोबत नागरिकांची आरोग्य तपासणीदेखील करण्यात येत आहे.

आदिवासी भागासाठी सिकलसेल ॲनिमिया निर्मुलन कार्यक्रम, एकलव्य निवासी शाळेत प्रवेश, शिष्यवृत्ती योजना, वन धन विकास केंद्र आदींबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. शासकीय योजनांबाबत जागरुकता निर्माण करण्यासोबतच संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणीदेखील यात्रेदरम्यान होत असल्याने या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विविध योजनांची माहिती देणारा दृकश्राव्य माध्यमाने सज्ज चित्ररथ या यात्रेचे प्रमुख आकर्षण आहे. दृकश्राव्य माध्यमाद्वारे नागरिकांशी संवाद साधतांना त्यांना विविध योजनांची माहिती देणाऱ्या हस्तपत्रकांचे आणि कॅलेंडरचे वाटपही करण्यात येत आहे. यात्रेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेशही दाखविण्यात येत आहे. यात्रेला भेट देणारे नागरिक शपथ घेऊन विकसित भारतासाठी संकल्प करीत आहेत.

शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिक आणि नैसर्गिक शेती व मृदा आरोग्य पत्रिकेवरील चर्चा ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरत आहे. स्थानिक पातळीवर यश संपादन केलेल्या महिला आणि खेळाडूंचा सत्कार हेदेखील या यात्रेचे वेगळे वैशिष्ट्य आहे. यात्रेदरम्यान आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणी आणि किसान क्रेडीट कार्ड नोंदणी करण्यात येत आहे. तसेच विकसित भारत संकल्प यात्रेत पात्र लाभार्थ्यांकडून विविध योजनेचे अर्ज भरुन घेण्यात येत आहे. या कार्यक्रमांत नागरिकांनी विकसित भारत संकल्पनेची शपथ नागरिकांना देण्यात आली.यावेळी मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला यात्रेचे स्वागत ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच, ग्रामस्थ व लाभार्थी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.