योग्य वेळी पहाटेच्या शपथविधीवर पुस्तक लिहणार!

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : ‘लोक माझे सांगाती’ हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या दुसरी आवृत्तीचे प्रकाशन दि.२ मे रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झाले. त्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले असल्याचे माध्यमातून सांगितले जात आहे. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पवार साहेबांचे ‘लोक माझे सांगाती’ ह्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती मी अजून वाचलेली नाही. त्यामुळे त्यावर बोलणार नाही. मात्र योग्य वेळ आल्यावर पहाटेच्या शपथविधीवर मी पुस्तक लिहिणार आहे. तेव्हा नेमके काय झाले होते याबाबत सगळ्यांना कळेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

‘लोक माझे सांगाती’ या दुसऱ्या आवृत्तीत ७० पानांची जोड आहे.या आवृत्तीत २०१९ नंतर राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आले आहे. या पुस्तकात शरद पवार यांनी प्रथमच अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर सविस्तर भाष्य केले आहे. या राजकीय आत्मचरित्रात अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर होतं, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.माझ्या संमतीनंच हे घडत असल्याची समजूत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना करून देण्यात आली होती, असेही शरद पवारांनी सांगितले आहे.