जळगाव : लाडक्या बहिणींना भेटण्याच्या दौऱ्याची सुरुवात जळगाव जिल्ह्यापासून केली. ज्या देशातील महिला विकसित होतील तोच देश विकसित होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. त्यामुळेच राज्यात ही योजना राबवण्यात आली. कोट्यवधी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा आमचा मानस आहे, असे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ मंगळवारी जळगावात करण्यात आला. सागर पार्क मैदानावर आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, अनिल पाटील, खा.स्मिता वाघ, आ.राजुमामा भोळे, आ.लता सोनवणे, आ.चंद्रकांत पाटील, आ.चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील, संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
बचतगटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे काम करत आहोत. महिलांना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला तर काहींच्या पोटात दुखू लागले. १५०० रुपयात बहिणीचे प्रेम कुणीच विकत घेऊ शकत नाही, ही केवळ भाऊबीजेची भेट आहे. विरोधकांना संधी दिली होती त्यांनी कवडीपण दिली नाही. सावत्र भावांपासून सावध रहा. एकदा भाऊबीज दिली की त्या बदल्यात केवळ माया, प्रेम मिळते. जोपर्यंत महायुतीचे सरकार आहे तोपर्यंत कुणाचा बाप देखील पैसे परत घेऊ शकणार नाही.
१ कोटी ३५ लाख महिलांचे अर्ज आले आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी सुरू आहे. कदाचित कुणाचे पैसे आले नाही तर लगेच सावत्र भाऊ तुम्हाला भडकावतील मात्र चिंता करू नका, कुणालाही वंचीत ठेवणार नाही. एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सुट दिली त्याचा फायदा म्हणून एसटी महामंडळ नफ्यात आले. काही लोक खोटे बोलून बोलून निवडणूक जिंकू पाहत आहेत, असे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.