पंढरपूर : कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा गुरुवार २३ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरा होत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना सकल मराठा समाजाने देखील या कार्तिकी एकादशीला शासकीय महापूजेत उपमुख्यमंत्र्यांच्या सहभागाला विरोध केल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडणार आहे.
सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने कुणबी जातीच्या नोंदी वेगाने शोधणे, मराठा भवन बांधणे, सारथीचे उपकेंद्र सुरू करणे, मराठा विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधणे व मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांचा वेळ मिळणे, या मागण्या करण्यात आल्या. त्यावर जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकल मराठा समाजाने केलेल्या उपरोक्त पाचही मागण्या तात्काळ मान्य केल्या आहेत.
त्यामुळे आता उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेतील सहभागाचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा २३ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरात विठ्ठल रूक्मिणीची शासकीय पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत ३० मिनिटे चर्चा करणार आहेत.