मुंबई : नरेटिव्ह सेट करणाऱ्या फेक बातम्यांवर नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत यावर खूप चर्चा झाली होती. आताही राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही फेक नरेटिव्हवरुन मोठा गदारोळ झाला. यावर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेक नरेटिव्ह करणाऱ्यांविरोधात आता गुन्हा दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे.
पेपरफुटी प्रकरणावरुन चर्चा सुरु असताना आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील पेपफुटीच्या प्रकरणांची यादी वाचून दाखवली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना भास्कर जाधव यांनी फेक नरेटिव्ह मांडल्याचे म्हटलं. भास्कर जाधव यांनी वाचून दाखवलेले कुठलेही घोटाळे झालेले नाहीत. पुण्यातील एका वेबसाईटने हा मेसेज सगळ्यात आधी व्हायरल केला. ज्यांनी हा फेक नरेटिव्ह तयार केला आता मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे, देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“खोटं नरेटिव्ह पसरवणाऱ्यांकडून राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. राज्यातल्या तरुणांमध्ये गैरविश्वास निर्माण करणे, एक लाख नोकऱ्या मिळाल्यानंतरही फेक नरेटिव्ह पसरवणे आणि यासाठी संघटित गुन्हेगारी काम केले जात असल्याची शंका महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये आहे. असे प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करणार का आणि राज्यात यासाठी कायदा आणणार का,” असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला होता.
त्यावर उत्तर देताना याच विधानसभा अधिवेशनात कायदा आणणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. “अभिमन्यू पवार यांच्याबरोबर जे शिष्टमंडळ आलं होतं, त्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं होतं की कायदा आणू. मुख्यंत्र्यांनी यासाठी मागणी मान्य करुन आदेश लागू केले आहेत. याच अधिवेशनात आपण कायदा आणणार आहोत,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.