भुजबळानंतर आता धनंजय मुंडेंनाही धमकी!

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर आता नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीतील घरी धमकीचा फोन आला होता. मला 50 लाख रुपये द्या, नाहीतर मी तुम्हाला जीवे मारिन अशी धमकी फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ज्या व्यक्तीनं धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी फोन केला होता. त्यानं सांगितलं की, “मला धनंजय मुंडे यांना मारण्याची सुपारी देण्यात आली आहे. मला तुम्ही 50 लाख रुपये द्या, नाहीतर मी धनंजय मुंडेंना जीवे मारिन.” छगन भुजबळ काल पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीनं मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचं सांगितलं. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं स्वतःचं नाव प्रशांत पाटील असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्याला अटक केली आहे.