धुळे : कोयत्याचा धाक दाखवून लूट करणार्या दोघा कुविख्यात आरोपींच्या धुळे गुन्हे शाखेने मुसक्या बांधल्या आहेत. आरोपींच्या अटकेने दोन गुन्ह्यांची उकल झाली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील सुमारे एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अकबर अली केसर अली शाह (30, शब्बीर नगर, चाळीसगाव रोड, धुळे) व नईम ईसाक पिंजारी (35, अलहेरा हायस्कूल, जामचा मळा, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.
कोयत्याच्य धाकावर केली लूट
तक्रारदार दीपक शिवलाल अहिरे (33, रा.बिलाडी, ता.धुळे) हे गुरुवार, 9 रोजी सायंकाळी साडेसात वाजता शहरातील बारापत्थर चौकातील जियाभाई यांच्या मोटर सायकलचे गॅरेजवर उभे असतांना संशयित अकबर जलेला (रा. पूर्व हुडको, चाळीसगाव रोड, धुळे) व त्याच्या एका साथीदाराने शिविगाळ करीत कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील दहा हजारांची रोकड, उजव्या हातातील चांदीचे ब्रासलेट तसेच टेक्नो कंपनीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अट्टल गुन्हेगार : एक लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींबाबत गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर कुसुंबा गावातील हॉटेल कलकत्ता पंजाबजवळून त्यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून सात हजार 830 रुपयांची रोकड, 15 हजारांचा नेकलेस, सहा हजार 400 रुपये किंमतीचे चांदीचे ब्रेसलेट, लोखंडी जॅक, टॅमी, 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण एक लाख एक हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींच्या चौकशीत त्यांनी धुळे शहर व तालुका हद्दीतील गुन्ह्याची कबुली दिली असून अकबर अली केसरविरोधात चाळीसगाव रोड पोलिसात चार, साकी्र येथे दोन व आझाद नगर येथे घरफोडीसह एनडीपीएस अॅक्टन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्री.संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, यांच्या नेतृत्वात सहा.निरीक्षक प्रकाश विक्रम पाटील, हवालदार अशोक पाटील, संदीप सरग, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रवीकिरण राठोड, विशाल पाटील, महेश मराठे आदींच्या पथकाने केली.