Dhule : एक स्थानक-एक उत्पादना’द्वारे रोजगार उपलब्धतेला मोठी चालना

Dhule  :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांपासून देशभरात अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचे महत्‌कार्य सुरू आहे. याच अनुषंगाने आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ८५ हजार कोटी रुपयांच्या भारतीय रेल्वेच्या सहा हजारांहून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण व शिलान्यास होत आहे. यात एक स्थानक-एक उत्पादन व जनऔषधी केंद्रांचाही समावेश आहे. यातून रेल्वेस्थानकांद्वारे रोजगार उपलब्धीलाही चालना मिळेल. पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतील विकसित भारताच्या दृष्टीने आज आणखी एक पाऊल उचलले गेले आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी केले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी नऊला दूरदृश्य प्रणालीद्वारे भारतीय रेल्वेच्या ८५ हजार कोटी रुपयांच्या निधीतून देशभरातील विविध योजनांचे लोकार्पण व शिलान्यास झाला. त्या अनुषंगाने येथील रेल्वेस्थानकातही रेल्वे विभागातर्फे कार्यक्रम झाला. त्यात श्री. अंपळकर बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, रेल्वेचे अधिकारी अर्पित गुढदे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर प्रदीप कर्पे, भाजपचे ज्येष्ठ नेते हिरामण गवळी, विजय पाच्छापूरकर, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, भाजप महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा वैशाली शिरसाट, जितेंद्र चौवटिया, ओमप्रकाश खंडेलवाल, शिवाजीराव काकडे, भगवान देवरे, राजेश पवार, योगेश मुकुंदे, पवन जाजू, सुहास अंपळकर, श्यामसुंदर पाटील, अनिल थोरात, आनंदा चौधरी, सुनील देवरे, अरुण पवार, प्रकाश उबाळे, अनिल सोनार, योगिता बागूल, बन्सी जाधव, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, हरीश शेलार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

रेल्वेस्थानकांद्वारे रोजगारवृद्धी : अंपळकर

 

श्री. अंपळकर म्हणाले, की स्थानिक पातळीवरील उत्पादनांना मागणी वाढावी, त्यांची विक्री होऊन उत्पादकांना अधिकाधिक रोजगार मिळावा व देशी उत्पादन विक्रीतून भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळावी म्हणून एक स्थानक-एक उत्पादन याअंतर्गत रेल्वेस्थानकांमध्ये १५०० स्टॉल उभारण्यात आले आहेत. यातून विविध वस्तू उत्पादकांना रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून एक हक्काची बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक उन्नतीला हातभार लागणार आहे. एवढेच नव्हे, तर प्रवाशांसाठी अल्प किमतीत जनऔषधी केंद्रांद्वारे विविध औषधेही उपलब्ध होणार आहेत. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांतून येथील रेल्वेस्थानकाचे आधुनिकीकरण होत आहे. याच जोडीला आता रेल्वे प्रवाशांसाठी येथील स्थानकात अनेक स्थानिक उत्पादकांच्या वस्तूही उपलब्ध होणार असल्याने रोजगाराला चालना मिळेल.

 

देशाची आधुनिकीकरणाकडे वाटचाल : सोनार

 

माजी महापौर चंद्रकांत सोनार म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या १० वर्षांत अनेक विकासकामे होत आहेत. यातून देशाची आधुनिकीकरणाकडे वाटचाल सुरू झाली आहे. आपल्या धुळे मतदारसंघातही खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी अनेक योजना राबवून जिल्ह्याच्या विकासाला एक नवा आयाम दिला आहे. त्यांनी निधी आणल्यामुळे येथील रेल्वेस्थानकाचे आधुनिकीकरण होत आहे. आता रेल्वेस्थानकांत स्थानिक उत्पदाकांच्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याने रोजगारातही वाढ होणार आहे.

 

देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना : कर्पे

 

माजी महापौर प्रदीप कर्पे म्हणाले, की पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने रेल्वे स्थानकांवर एक स्थानक एक उत्पादन या माध्यमातून विविध समाजघटकांतील स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आजपासून जो उपक्रम सुरू केला आहे त्यातून अनेक समाजांतील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यात पारंपरिक वस्तूंना मागणी वाढून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. भारतातील रेल्वेस्थानकांचा विकास होत असून, यातून प्रवाशांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. वंदे भारतसारख्या उच्च प्रतीच्या रेल्वे प्रवासाची व्यवस्था उपलब्ध झाली आहे. यातून विकसित भारताकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे.

 

भारतीय रेल्वेने टाकली कात : गवळी

 

हिरामण गवळी म्हणाले, की आज देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक स्थानक-एक उत्पादन यासह विविध योजनांचे उद्‌घाटन होत आहे. या केंद्राद्वारे प्रवाशांना अल्प दरात विविध वस्तू उपलब्ध होणार आहेत. गेल्या १० वर्षांत भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. प्रवाशांसाठी देशभरातील विविध रेल्वेस्थानकांचे आधुनिकीकरण होत आहे. २०१४ पूर्वीची रेल्वे व्यवस्था आणि २०१४ नंतरची रेल्वे व्यवस्था यात जमीन-अस्मानाचा फरक जाणवतो. अनेक नवीन रेल्वेमार्ग होत आहेत. वंदे भारतसारख्या अनेक नवीन रेल्वेगाड्या सुरू झाल्या. यातून भारताची विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

 

रेल्वेचे अधिकारी अर्पित गुढदे, दयाशंकर द्विवेदी, प्रशांतकुमार, राजीवकुमार, एच. डी. ठाकूर, व्ही. एम. नगराळे, स्टेशन प्रबंधक संतोष जाधव, संतोष पाटील, चंद्रकांत कवडे, रामेश्वर नंबोळकर, विशाल पाटील, भूपेंद्र पाटील, दुर्गेश ठाकूर आदींनी संयोजन केले. भाजपचे जिल्हा प्रवक्ता श्यामसुंदर पाटील यांनी सूत्रसंचालन केले.