Dhule : शहरातील भूमाफियांनी तत्कालीन भूमी अभिलेख अधिकाऱ्यांशी संगनमत करत महापालिकेचे अनेक भूखंड हडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे-पाटील, मुख्य अभियंता कैलास शिंदे यांनी सातत्याने तीन ते चार वर्षे पाठपुरावा करत दसेरा मैदानालगतचा मोक्याच्या जागेवरील भूखंड भूमाफियांच्या घशातून खेचून आणला. त्यामुळेच आज त्या जागेवर व्यापारी संकुल साकारत असून, याद्वारे महापालिकेला उत्पन्नाचा आणखी एक स्रोत उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.
येथील दसेरा मैदानालगत महापालिकेच्या भूखंडावरील व्यापारी संकुलाचे भूमिपूजन आज सकाळी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर प्रतिभा चौधरी, चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, ज्येष्ठ नेते हिरामण गवळी, प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, महापालिकेचे मुख्य अभियंता कैलास शिंदे, भीमसिंह राजपूत, भारती माळी, अल्पा अग्रवाल, विजय पाच्छापूरकर, ओमप्रकाश खंडेलवाल, जितूबापू, संदीप बैसाणे, बंटी मासुळे, चेतन मंडोरे, आरती पवार, राकेश अग्रवाल, वैशाली शिरसाट, आकाश परदेशी, दगडू बागूल, बन्सी जाधव, जयंत वानखेडकर, भगवान चौधरी, श्याम पाटील, सुहास अंपळकर, अरुण पवार, राजेश पवार, सुबोध पाटील, बबन चौधरी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार डॉ. भामरे म्हणाले, की धुळे शहरातील अनेक भूखंडांवर भूमाफियांनी कब्जा केल्याचे दिसून येते. दसेरा मैदानालगतचा असाच महापालिकेचा एक भूखंड भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करत भूमाफियांनी घशात घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बाब गजेंद्र अंपळकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तसा पाठपुरावा सुरू केला.
तसेच आपल्या कानावर ही बाब घातल्यानंतर संबंधित भूमी अभिलेख अधिकाऱ्याला बोलावून घेतले व नियमाप्रमाणे हा भूखंड महापालिकेच्या नावावर केला नाही तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा, अशी तंबी दिली. त्यानंतरच हा भूखंड महापालिकेच्या नावावर झाला. यासाठी अंपळकर यांना आयुक्त अमिता दगडे-पाटील व अभियंता शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यासाठी श्री. अंपळकर यांच्यासह आयुक्त व अभियंत्यांचेही जाहीर अभिनंदन करतो. शहर विकासासाठी आपले सदैव सहकार्य राहील.
डॉ. बाबांमुळेच भूखंड परत : अंपळकर
महापालिकेचा दसेरा मैदानालगतचा भूखंड भूमाफियांनी हडप केला होता. मात्र, खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत साडेचार वर्षे पाठपुरावा केल्यानंतर हा भूखंड पुन्हा महापालिकेच्या ताब्यात आला. यासाठी अभियंता कैलास शिंदे व आयुक्त दगडे-पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
श्री. कदमबांडे म्हणाले, की भूमिपूजन होत असलेल्या व्यापारी संकुलामुळे महापालिकेच्या उत्पन्नात भर पडण्यास मदत होणार आहे. हा भूखंड भूमाफियांच्या तावडीतून सोडविणाऱ्या गजेंद्र अंपळकर व कैलास शिंदे यांचे अभिनंदन करतो. श्री. शर्मा यांनीही मनोगत व्यक्त केले. श्याम पाटील यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.