Dhule : तरुण पिढीला स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन मिळण्यासाठी धुळे जिल्ह्यात पंडित दीनदयाल उपाध्याय मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायती राज, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
पंडित दीनदयाल उपाध्याय मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान 2023 उद्धटन सोहळा पालकमंत्री श्री.महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, खासदार डॉ.सुभाष भामरे, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे- पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, सहयाद्री आयएसआय पुणे संस्थेचे दिपक चौगुले, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभाताई चौधरी, जयश्री अहिरराव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.महाजन म्हणाले की, मी तीन जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. या तीनही जिल्ह्यामध्ये तरुणांसाठी मोफत स्पर्धा परीक्षेसाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. या मार्गदर्शन केंद्रातून विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळणार आहे. सह्याद्री आय. ए. एस. अॅकेडमी, पुणे मार्फत मोफत प्रशिक्षण राबवित आहे. राज्यात विविध पदांसाठी परीक्षा आयोजित केल्या जातात. विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि वेगवेगळ्या शासकीय सेवांच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या परीक्षांची काठिण्य पातळी अधिक वाढवण्यात आली आहे. या स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी जिल्हा नियोजन समितीच्यावतीने धुळे जिल्ह्यात “पंडित दीनदयाल उपाध्याय मोफत स्पर्धा परीक्षा अभियान” राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी हे मार्गदर्शन केंद्र उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, 2047 साली आपण जेव्हा स्वातंत्र्याची शतकपूर्ती करू तेव्हा आपला भारत देश हा सुपर पॉवर झालेला राहील. आज जगात भारताचे स्थान उच्च आहे. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवनवीन कल्पना, संकल्पना देशात राबवित आहे. त्यामुळे भारत देश हा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. आमचे सरकार सर्वसामान्य लोकासाठी काम करीत असून प्रत्येक गरीब व्यक्तीला घरकुल, मोफत धान्य, आरोग्य विमा यासारख्या योजना राबवित आहे. आपण या देशाचे नागरिक असुन स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी संघर्ष करा. चांगले काम करा प्रामाणिकपणे काम करा यातून कामाचे आत्मिक समाधान देखील मिळत असते म्हणून तरुणांनी जर मनाशी ठरवले तर अशक्य गोष्टीही शक्य करु शकतात असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले की, धुळे शहर व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळण्यासाठी पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार पंडित दीनदयाल उपाध्याय मोफत स्पर्धा परीक्षा अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सहयाद्री आयएसएस ॲकडमी,पुणे या सस्थेमार्फत विद्यार्थ्यांना लाईव्ह व्हिडीओ लेक्चर तसेच रेकॉर्डेड व्हिडीओ लेक्चर प्रत्येक परीक्षेसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी बसणार आहे त्यांना याचा लाभ होणार आहे. या स्पर्धा मार्गदर्शन अभियानासाठी जवळपास 5 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. कुठलीही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मनपुर्वक अभ्यास करावा जेणे करुन कुठल्या ना कुठल्या ठिकाणी निश्चित त्यांना यश मिळेल असे त्यांनी सांगितले. यावेळी सहयाद्री आयएसएस ॲकडमी, पुणेच्या संचालक दिपक चौगुले यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.