Dhule : कुठलाही जातिभेद, धर्मभेद न करता गेली ४० वर्षे निःस्वार्थ वैद्यकीय सेवेतून जनसामान्यांना नव्याने जीवन देणारे तसेच गेली १० वर्षे राजकीय क्षेत्रात वावरताना आपला विनम्र स्वभाव, विनयशील वृत्ती जोपासत लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार तथा माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी अहोरात्र कार्य करत आहेत. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून धुळे शहरातील २८ ज्येष्ठ नागरिक संघ व या संघांच्या ७ हजारांहून अधिक सदस्यांतर्फे खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य व्ही. के. भदाणे, राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. सुलभा कुवर, फेसकॉम खानदेशचे उपाध्यक्ष ॲड. एम. एस. पाटील, शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा माजी न्या. ॲड. जे. टी. देसले, फेसकॉमचे खानदेशचे सचिव प्रा. बी. एन. पाटील, साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एन. पी. वाणी, जयहिंद संघाचे अध्यक्ष संतोष सूर्यवंशी, संत तुकाराम संघाचे अध्यक्ष पी. सी. पाटील, फेसकॉमचे कोशाध्यक्ष अरविंद पाखले, मुक्ताई महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा उषा कुलकर्णी, सावली संघाच्या अध्यक्षा जयश्री शहा, कौशल्या संघाच्या अध्यक्षा डॉ. उषा साळुंके, जिजामाता संघाच्या अध्यक्षा प्रा. उषा पाटील, सहारा संघाचे अध्यक्ष शांताराम पाटील, ओंकारेश्वर संघाचे अध्यक्ष दगडू दंडगव्हाळ, उत्कर्ष संघाचे अध्यक्ष प्रकाश लगडे यांच्यासह अन्य ज्येष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
प्राचार्य भदाणे, म्हणाले, की मितभाषी असलेल्या खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी वेळोवेळी ज्येष्ठ नागरिक संघांसह सदस्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिल्ली दरबारी पाठपुरावा केला. कमीत कमी बोलणे व जास्तीत जास्त काम करणाऱ्या डॉ. भामरे यांनी ज्येष्ठ नागरिकांना लागणारे आवश्यक ते सर्व सहकार्य विनासायास उपलब्ध करून दिले. श्री. सूर्यवंशी म्हणाले, की वैद्यकीय तसेच राजकीय क्षेत्रात काम करताना खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून विनम्रपणे सेवा दिली. एवढेच नव्हे तर जयहिंद ज्येष्ठ नागरिक संघ व बिजलीनगरमधील संत तुकाराम ज्येष्ठ नागरिक संघांच्या भवनासाठी खासदार निधीतून अनुक्रमे आठ व दहा लाखांचा निधीही उपलब्ध करून दिला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचा लाभ द्यावा, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घालून द्यावी, रेल्वे प्रवासात पूर्वीप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना ४० टक्के व महिलांना ५० टक्के सवलत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, आदी मागण्याही केल्या. यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. भामरे यांना मानपत्र दिले. ॲड. एम. एस. पाटील यांनी त्याचे वाचन केले. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळावी, आपण तिसऱ्यांदा खासदार म्हणून विजयी व्हावे, तसेच केंद्र सरकारमध्ये आपल्याला पुन्हा मंत्रिपद मिळावे, अशा सदिच्छा देत ज्येष्ठ नागरिकांनी आम्ही तुमच्या प्रचारासाठी अहोरात्र झटत खारीचा वाटा उचलू, अशी ग्वाहीही खासदार डॉ. सुभाष भामरे यांना दिली.
ज्येष्ठ नागरिक संघांनी आत्मीयतेने सन्मानपत्र देत माझा केलेला सत्कार माझ्यासाठी आनंदाचा परमोच्च क्षण आहे. यासाठी मी सदैव आपला ऋणी आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या केंद्रीय फायनान्स कमिटीमध्ये नक्कीच मांडीन. ज्येष्ठांना रेल्वे प्रवासात सवलतीसाठी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करीन. तसेच आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड मिळवून देण्यासाठी लवकरच धुळे शहरात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र शिबिर घेऊन पूर्तता केली जाईल.
-खासदार डॉ. सुभाष भामरे
असा आहे मानपत्रातील मजकूर
खासदार डॉ. सुभाष भामरेजी, आपण अनेक वर्षांपासून जनसेवा करीत आहात. लोकसभेच्या धुळे मतदारसंघातून आपण भरघोस मतांनी निवडून येत असता. आम्ही धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या एकूण २८ संघांतील सुमारे सात हजार ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी राहत त्यांच्या अडचणी सोडवत असतात. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण असंख्य रुग्णांना सेवा दिल्यामुळे ते सारे आपणास देवासमान मानतात. याबाबत आम्हास आनंद आहे व आम्ही आपले आभारी आहोत.
आपण केंद्रीय फायनान्स कमिटीचे सदस्यही आहात. याबाबत आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. अखिल भारतीय स्तरावरील काही प्रमुख मंडळींनी आपली भेट घेऊन केंद्रीय अर्थसंकल्पात ज्येष्ठांसाठी काही अंशी तरतूद करावी, असा पत्रव्यवहार केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्याकडे केला आहे. या संदर्भात आपण दखल घेतलेली आहे.
आमच्या ज्येष्ठांच्या अधिवेशनात (२०२३-२४) झालेले ठराव आपणास यापूर्वीच दिले हेत. त्याबाबतही आपण जाणीवपूर्वक लक्ष घालत असता. हे सर्व लक्षात घेता आम्ही आपणास हे सन्मानपत्र देऊन सत्कार करीत आहोत. याचा स्वीकार करावा, ही नम्र विनंती. यापुढील आपले समाजसेवी जीवन राजकीय क्षेत्राद्वारे अधिक उंचावत जावो. आपले पुढील आयुष्य आरोग्यदायी, आनंददायी व सुखसमृद्धीचे जावो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.