Dhule : केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत धुळ्यासह देशभरातील ५५४ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास, सुशोभीकरणासह देशभरातील १५०० रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपासच्या कामांचे औपचारिक शिलान्यास आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन झाले.
दरम्यान, लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या पाठपुराव्याने धुळे रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल ९ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध झाला असून, रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.
केंद्र सरकारच्या ४१ हजार कोटींच्या निधीतून धुळे शहरातील रेल्वेस्थानकासह देशभरातील ५५४ स्थानके आणि रेल्वेमार्गांवरील १५०० हून अधिक ओव्हरब्रीज आणि अंडरपासच्या कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. त्यानिमित्त आज सकाळी अकराला येथील रेल्वेस्थानकात झालेल्या कार्यक्रमास खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर प्रदीप कर्पे, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी ॲड. एम. एस. पाटील, हिरामण गवळी, विजय पाच्छापूरकर, यशवंत येवलेकर, नगरसेवक शीतल नवले, बंटी खोपडे, ओम खंडेलवाल, आकाश परदेशी, योगिता बागूल, किशोर सिंगवी, ॲड. किशोर जाधव, नरेश चौधरी, किरण देशमुख, चेतन मंडोरे, दगडू बागूल, अमोल मासुळे, संजय बोरसे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व विविध शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या १० वर्षांतील रेल्वेच्या प्रगतीचा आढावा घेत भविष्यातील विविध परियोजनांची माहिती दिली.
धुळे रेल्वेस्थानकात विविध सोयी-सुविधा
या कार्यक्रमात खासदार डॉ. भामरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या सहकार्यामुळे व आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे देशभरातील अमृत भारत स्टेशन विकास योजनेत धुळे स्थानकाचा समावेश करून घेण्यात यश मिळाले. यात धुळे रेल्वेस्थानकाचे आधुनिकीकरण होत असून, प्रवाशांना या स्थानकात अनेक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या आधुनिकीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी आपण ९ कोटी ५० लाखांचा निधी मिळविला. या निधीतून येथील रेल्वेस्थानकाला दोन प्रवेशद्वारांसह प्रशस्त लॉबी, पाथ वेसह पार्किंगमध्ये अनेक सोयी-सुविधा, प्लॅटफॉर्मवर सीओपीची सुविधा, नवीन अत्याधुनिक शौचालये, प्रवाशांसाठी आसनव्यवस्थेसह वेटिंग एरियामध्ये फर्निचरसह विविध सोयी-सुविधा, प्रवाशांना पिण्यासाठी आरोग्यदायी पाणी व्यवस्था, रेल्वेस्थानकाच्या इमारतीचे सौंदर्यीकरण, तसेच वेटिंग रूम,म बुकिंग ऑफिस, प्रवेशद्वाराचे इंटेरिअर, प्रवाशांच्या माहितीसाठी इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड आदी सोयी-सुविधांचा समावेश आहे.
जिल्ह्यात २४ ठिकाणी अंडरपास, ओव्हरब्रीज
खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले, की धुळे येथील रेल्वेस्थानकातून मुंबईसाठी १८ डब्यांची रेल्वेगाडी रोज धावते आहे. तसेच दिवसातून तीन वेळा धुळे-चाळीसगाव दरम्यान मेमू ट्रेनही धावते आहे. तसेच आपल्या प्रयत्नाने धुळे-चाळीसगाव रेल्वेमार्गाचे संपूर्ण विद्युतीकरणही झाले आहे. धुळे-चाळीसगावदरम्यान धुळे शहरासह मोहाडी, सावळदे, बोरविहीर, शिरूड, चांदे, मोरदड तांडा येथे १५ गेटवर अंडरपासचे काम होत आहे. यासाठी ४१ कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर करून घेतला आहे. तसेच शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा, होळ, मेथी, शिंदखेडा, दोंडाईचा व सोनशेलू येथील नऊ गेटसाठी तब्बल ३६ कोटी रुपयांचा, असा एकूण ७७ कोटी रुपयांचा निधीही प्राप्त करून घेतला असून, आज या कामांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिलान्यास होत आहे.
यावेळी रेल्वेचे नोडल ऑफिसर शरद कोटेचा, दयाशंकर द्विवेदी, स्थानक अधीक्षक संतोष जाधव, नंदकुमार पाटील, भुसावळचे मुख्य कार्यालयीन अधीक्षक उमाकांत बावस्कर आदींनी संयोजन केले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच रेल्वे विभागातर्फे झालेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना खासदार डॉ. भामरे व मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. श्री. बावस्कर यांनी सूत्रसंचालन केले.
येत्या सहा महिन्यांत धुळे-पुणे रेल्वे : डॉ. भामरे
खासदार डॉ. भामरे म्हणाले, की जिल्हावासीयांच्या मागणीनुसार आपण मुंबईसाठी धुळ्याहून रोज एक्स्प्रेस रेल्वे सुरू केली आहे. या रेल्वेला धुळेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, ही एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी धावणार आहे. याशिवाय नागरिकांच्या मागणीनुसार आपण आता धुळे ते पुणे या रेल्वेसाठीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करत आहोत. येत्या सहा महिन्यांत धुळे-पुणे रेल्वेही धावू लागेल, अशी ग्वाहीही खासदार डॉ. भामरे यांनी यावेळी दिली.