चाळीसगाव : धुळ्याकडून चाळीसकडे येणार्या 01310 मेमू ट्रेनखाली आल्याने आठ पाळीव जनावरांचा जागीच चिरडून मृत्यू झाला तर गुराखीदेखील ठार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी सव्वा चार वाजता राजमाने स्थानकापासून काही अंतरावरील शिदवाडी गावाजवळ घडली. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत राजेंद्र भीमराव सूर्यवंशी (50, शिदवाडी) या गुराख्याचा मृत्यू झाला.
गुरांचा कळप रेल्वे रूळावर येताच दुर्घटना
सूत्रांच्या माहितीनुसार, धुळ्याकडून निघालेली मेमू ट्रेन 01310 ही चाळीसगावकडे निघाल्यानंतर खांबा किलोमीटर 344 जवळ गुरांचा कळप रेल्वे रूळावर आल्यानंतर मेमूची जबर धडक बसल्याने दोन गायी, दोन बैल, दोन म्हशी, वासरू, पारडू अशी 8 जनावरे कापली जावून मयत झाली तर गुराखी राजेंद्र सूर्यवंशी हादेखील ठार झाला. मेमूच्या जबर धडकेने काही जनावरे रेल्वे रुळापासून लांब फेकली गेली तर काही जनावरे रेल्वेखाली अडकली. अपघातानंतर सुमारे तासभर मेमू गाडी घटनास्थळी थांबून होती. रेल्वेखाली अडकलेली जनावरे काढल्यानंतर मेमू चाळीसगावकडे रवाना करण्यात आली.
अपंग सालदाराचा परीवार उघड्यावर
सूत्रांच्या माहितीनुसार, मेमूच्या धडकेने मयत झालेली जनावरे शिदवाडी येथील प्रतापसिंग वजेसिंग जाधव यांच्या मालकिची होती व त्यांच्याकडे सालदार म्हणून राजेंद्र भीमराव सुर्यवंशी (50) हे कामास होते. रेल्वे पटरीवर गुरे गेल्याने आणि समोरून रेल्वे येत असल्याने सुर्यवंशी हे गुरे हाकण्यासाठी धडपड करीत असतांनाच दुर्देवाने तेही रेल्वेखाली सापडून ठार झाले. सूर्यवंशी हे एका हाताने अपंग होते व ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेले होते व तेथून येवून ते पुन्हा मूळ मालकाच्या शेतात कामासाठी बुधवारपासून रूजू झाले होते. पहिल्याच दिवशी त्यांच्या दुर्देवी मृत्युने त्यांचा परीवार उघड्यावर पडला आहे. मृत राजेंद्रच्या पश्चात पत्नीसह मुलगा व मुलगी असा परीवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब निराधार झाले आहे. या घटनेत प्रतापसिंग जाधव यांच्या मालकीचे सर्व पशुधन ठार झाल्याने सुमारे पाच लाखांचा फटका त्यांना बसला आहे.
शेतकर्यांची घटनास्थळी धाव
गुरे चिरडल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. काही क्षण भितीचे वातावरण निर्माण झाले होत. तर घटना घडताच परीसरातील शेतकर्यांसह नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटना कशी घडली हे नेमके समजून आले नाही मात्र रेल्वेच्या धडकेने तब्बल
आठ गुरे चिरडून ठार झाल्याने एकच खळबळ उडाली. ज्या ठिकाणी ही जनावरे रेल्वेच्या धडकेने ठार झाली त्या रेल्वे पटरीवर गुरांच्या मासांचे तुकडे ठिकठिकाणी पडलेले होते.
मेहुणबारे पोलिसांची धाव
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेहुणबारे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण व सहकार्यांनी धाव घेतली. दरम्यान घटनेनंतर धुळे-चाळीसगाव मेमू सुमारे तासभर शिदवाडी येथेच थांबून होती. त्यानंतर ती जामदा रेल्वे स्थानकावर नेण्यात आली व पुढे चाळीसगाव रेल्वे स्थानकावर आणण्यात आली.