धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर आर्वी शिवारात एका झाडाच्या आडोशाला उभा असलेला मध्य प्रदेशातील सुमित ठाकरे (वय २०) याला अवैधरीत्या गांजाची तस्करी करताना तालुका पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्या बॅगेतून दोन लाखांचा गांजा हस्तगत केला. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील व परिविक्षाधीन उपअधीक्षक सागर देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तपासाचे चक्र फिरले. दि. ११ रोजी आर्वी शिवारातील खुशाल अल्लोर यांच्या हॉटेलच्या पुढे असलेल्या एका झाडाच्या आडोशाला उभा असलेला संशयित सुमित खडसिंग ठाकरे (वय २०, रा. धार,) याला पथकाने पकडले.
त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या कडील बॅगेत सुमारे १ लाख ९२ हजार रुपये किमतीचा ८ किलो २२० ग्रॅम सुका गांजा मिळाला. त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने हा गांजा इंदूर येथील सौरभ ठाकूर यांच्या मालकीचा असून तो कल्याण येथील एका व्यापाऱ्याकडे देण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.
यांनी केली कारवाई
सुमित ठाकरे याच्याविरोधात धुळे तालुका पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, साक्री उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सागर देशमुख यांच्यासहतालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील व धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली.