Dhule News : अज्ञाताने भिरकावला बसवर दगड, बसचे नुकसान, गुन्हा दाखल

धुळे : राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसवर अज्ञात व्यक्तीने दगड भिरकावल्याची घटना मंगळवारी नगाव गावानजीक घडली तर, विखरण येथील बसस्थानकानजीक गुरांची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन पोलिसांनी पकडले. याबाबत विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नगाव गावानजीक राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसवर अज्ञात व्यक्तीने दगड भिरकावल्याने बसची काच फुटली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. नंदुरबारहून कल्याण जाणाऱ्या या बसमध्ये २७ प्रवासी होते.

सुदैवाने कोणालाही दगड लागला नाही. बसचे मात्र नुकसान झाले. याप्रकरणी सायंकाळी उशिरा पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला.

नंदुरबारहून कल्याणकडे जाणारी एमएच २० बीएल १५५१ क्रमांकाची बस दोंडाईचा बस डेपोमधून मंगळवारी दुपारी निघाली. दीड वाजेच्या सुमारास ही बस नगांवनजीक असलेल्या अजमेरा महाविद्यालयासमोर एका अज्ञात दुचाकीस्वाराने थेट एचटीच्या काचेवर दगड भिरकावला. बसचालक संदीप सुभाष धनगर (रा. घोडवेल, जि. जळगांव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

शिरपुर तालुक्यातील विखरण येथील बसस्थानकानजीक गुरांची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन पोलिसांनी पकडले. यामध्ये ४ गुरांची सुटका करून अडीच लाख रुपये किमतीचे वाहन आणि चालकासह अन्य एकाला पकडण्यात आले.

रविवारी रात्री दहाच्या सुमारास पिकअप एमएच-४८टी-२०९६ यामध्ये चार गुरे मिळून आली. पोलिसांनी चारही गुरांची सुटका करीत सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

याप्रकरणी चालक जहीर अहमद लाल मोहम्मद अन्सारी (३५, रा. तिरंगा चौक, धुळे), त्यासोबत रसुल मोहम्मद हुसेन अन्सारी (४७, रा. माधवपुरा गल्ली नं. १४, रा. धुळे) या दोघांना अटक केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.