पावसाचा कहर! तापीचे पाणी थेट शेतात शिरले; शेतीपिकांचं मोठं नुकसान

धुळे : हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे तापी नदीला मोठा पूर ओलेला आहे. तापी नदीकाठावरील अनेक गावांना पाण्याचा वेढा पडलेला आहे. तसेच तापी नदीचे शेतात पाणी घुसल्यामुळे कपाशी व केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, बाळदे गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात नदीचे पाणी घुसल्यामुळे नुकसान सोसावे लागणार आहे. काही भागांत कपाशीचे पीक पाण्याखाली आले आहे. शनिवारी हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. यापूर्वी प्रशासनाने तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तापी काठावरील अनेक गावांना पाण्याचा वेढा पडलेला आहे. तापी काठावरील अनेक शेतांमध्ये पाणीदेखील शिरले आहे.

बाळदे येथे तापी नदीचे बॅकवॉटर अरुणावती नदीत आल्यामुळे ही नदीदेखील दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीचे पाणी काठावरील शेतात शिरल्यामुळे कपाशी, केळी पीक पाण्याखाली आले. त्यात भटू पाटील, प्रमोद पाटील, जगदीश पाटील, जयेश पाटील, मुकेश पाटील, देवीदास पाटील, भिकन पाटील, आनंदा पाटील, एकनाथ पाटील, भीला पाटील, गोकुळ पाटील, अरुण पाटील, संदीप पाटील, निंबा पाटील, दीपक पाटील आदी ४० ते ५० शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केळी पिकात अर्धेच्यावर तर अनेक शेतात कपाशीचे पीक बुडाल्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. दरम्यान कृषी विभागाने या नुकसानीचे पंचनामे करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी आहे.

हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला
शिरपूर तालुक्यात ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था होती, त्यांनी ऐन दुष्काळाच्या काळात कपाशीला पाणी देऊन जगविली. मात्र तापी नदीचे पाणी शेतात शिरल्याने अनेक शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाचे नुकसान झाल्याने- हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला अशी शेतकन्यांची भावना निर्माण झालेली आहे.

ममाणे शिवारात केळी, कापूस व मका पिके पाण्यात…..
तहाड़ी – हतनूर धरणाचे दरवाजे खुले केल्यामुळे तापी नदीला पूर आला आहे. यामुळे रविवारी तापी नदीच्या काठावर असलेल्या ममाणे शिवारातील शेतकरी भाऊसाहेब उखा पाटील, रावसाहेब उखा पाटील यांच्या शेतातील कापूस पिकाचे नुकसान झाले आहे, तर नंदलाल हेमराज कश्यप (सोनवणे) यांच्या शेतातील केळी पिकाचे नुकसान झाले. तसेच चतुर हेमराज सोनवणे, रवींद्र भिमराव पाटील, धनराज चैत्राम पाटील, शालिग्राम ताराचंद पाटील, रमेश ताराचंद पाटील, पांडुरंग ताराचंद पाटील, वामन किसन सोनवणे, महेंद्र तुकाराम धनगर, युवराज दंगल धनगर, लुका वंजी धनगर, महेंद्र सिताराम धनगर, पुंडलिक वंजी धनगर, संतोष यादव धनगर, भरत शालिग्राम करके या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने केळी, कापूस व मका पिकाचे संपूर्ण नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाच्या अधिकायांनी पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकयांनी केली आहे.