धुळे : अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठीचा कच्चा रसायनाचा साठा तसेच साधनसामग्रीसह गावठी हातभट्टीची दारूची निर्मिती करताना पोलिसांनी एकाला रंगेहाथ पकडले. कारवाईत दारूसह सर्व साहित्य जागीच नष्ट करण्यात आले.
छोटी शेलबारी (ता.साक्री) गावातील नाल्यामध्ये २४ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास देवराम शिवराम माळी, वय ४५ हा रा. शेलबारी ता. साक्री हा अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठीचा कच्चा रसायनाचा साठा तसेच साधनसामग्रीसह गावठी हातभट्टीची दारूची निर्मिती करतांना पोलिसांना आढळून आला. मासिक गुन्हे आढावा बैठकीदरम्यान धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी अवैध धंद्देबाबत तसेच गावठी हातभट्टीच्या कारखान्यावर कारवाई करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील शेलबारी शिवारात गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याच्या ठिकाणाची गोपनिय माहिती सपोनि श्रीकृष्ण पारधी यांना मिळाली होती.
त्यानुसार त्यास ताब्यात घेऊन १ लाख ३० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. त्यात ५० लिटर मापाचे ४२ प्लास्टिक बॅरल, प्रत्येक बॅरलमध्ये अंदाजे ४० लिटर कच्चे रसायन, कच्च्या रसायनाची अंदाजे किंमत ७० रुपये प्रति लिटर व प्रत्येक बॅरलची अंदाजे किंमत २५० रुपये तसेच २५ लिटर मापाचा एक स्टीलचा हंडा, त्यात अंदाजे २० लिटर इतकी गावठी हात भट्टीची तयार दारू, दारूची अंदाजे किंमत १०० रुपये प्रति लिटर असा एकूण १ लाख ३० हजार १०० रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू तसेच इतर साहित्य पिंपळनेर पोलिसांनी नष्ट केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाण्याचे स.पो.नि श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक बी.एम.मालचे, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, पोलीस उपनिरीक्षक भूषण शेवाळे, पोना सूर्यवंशी, पो.ना. हजारे, पो. कॉ. बोरसे, पोकॉ सोमनाथ पाटील, पोका कोळी, पोका सैंदाणे, पो. कॉ.धनगर यांच्या पथकाने केली.