धुळे : कोणत्याही जातीचा अथवा जमातीचा व्यक्ती घराविना राहू नये हा आमचा निर्धार आहे. त्यामुळेच शबरी घरकुल, रमाई घरकुल, ओबीसी घरकुल, मोदी आवास अशा विविध योजनांचे लाभ गावागावातील लोकांपर्यंत पोहोचवत असून प्रत्येकाने अर्ज करावा आणि लाभ घ्यावा. हे करत असतानाच हर घर जल योजनेचाही लाभ देत आहे. शिवाय ‘गाव तिथे रस्ता’ हे ध्येय घेऊन साक्री तालुक्यातील एकही गाव बिगर रस्त्याचे राहू नये म्हणून 100 कोटी च्या कामांचे भक्कम नियोजन केले आहे, शिवाय, येत्या बजेट मधून त्यापेक्षा मोठी तरतूद करणार असून शेतकरी, कामगार आणि महिला यांच्यासह प्रत्येक घटक आत्मनिर्भर बनावा हाच आमचा निर्धार आहे; असे महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि महा संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी स्पष्ट करून प्रत्येक बचत गटातील महिलांना तसेच दुधाळ जनावरे वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांना अर्ज करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित आणि महा संसद रत्न खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्या उपस्थितीत साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे महिला स्वयं सहायता समूह तसेच शेतकरी गट यांच्या सोबत ‘संवादातून समुद्धीकडे’ हा सुसंवाद सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.
सुमारे साडेचार हजारा महिलांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. मैदानावर महिलांच्या रेकॉर्ड ब्रेक उपस्थितीतून एक प्रकारे नारी शक्तीचा अविष्कार उमटलेला दिसला. साक्री तालुक्यातील जवळपास 175 महिला बचत गटाशी संबंधित महिला सदस्यांचा यात समावेश होता. योजना समजावून घेण्यासाठी प्रथमच एवढ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या त्यामुळे ही उपस्थिती विक्रमी म्हटली गेली.
या मेळाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य असे की महासंसाद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यामुळे आपल्या गावापर्यंत अनेक योजना पोहोचल्या असे मानून अनेक महिलांनी त्यांना भेटण्याच्या उत्सुकतेने हा प्रतिसाद दिल्याचे स्थानिक वर्तुळातून सांगण्यात आले.
या सोहळ्याला आदिवासी विकास विभागाशी संलग्न शबरी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त वसंत घरटे, ज्येष्ठ कार्यकर्ते एडवोकेट संभाजी पगारे, सुरेश सोनवणे, सचिन देसले, चंद्रवीर पाटील, विजय ठाकरे, झेडपी सदस्य सुमित्रा गांगुर्डे, खंडू कुंवर आणि अन्य पदाधिकारी तसेच धुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पाटील व संबंधित अन्य अधिकारी उपस्थित होते. दरम्यान शेतकरी उत्पादक गटांना 1 कोटी 34 लाख रुपयांचे केले धनादेश वितरण करण्यात आले तसेच महिला गटांना मंजूर कर्ज रकमेचे देखील वितरण करण्यात आले.
खासदार डॉ. हिना गावित यांनी गावागावातील सामान्य महिलांना डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने दिलेल्या योजनांची प्रभावी शब्दात माहिती दिली. जलजीवन मिशन च्या माध्यमातून प्रत्येक गावातील पाणी प्रश्न सोडवण्यात येत असून हर घर नल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरातील महिलेला मोदी सरकारने न्याय दिला आहे. आता बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही प्रत्येक गावातील बचत गटाला अर्थसहाय्य मिळवून दिले असून त्याचा लाभ घेण्यासाठी महिलांनी पुढे यावे असे आवाहन खासदार हिना गावित यांनी केले. आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी साक्री तालुक्यातील प्रत्येक गावातील रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून प्रत्येक जाती जमातीच्या घटकाला घरकुल देणे सुरू असल्याची माहिती दिली व लाभ घेण्याचे आवाहन केले. मेळाव्यात प्रारंभी लीना बनसोड यांनी आपल्या भाषणातून योजनांचे स्वरूप आणि लाभार्थ्यांना होणारे लाभ यासह प्रभावी शब्दात माहिती दिली.