धुळे : जुने धुळ्यातील रहिवासी असलेल्या श्रेया सोनार (३२) या विवाहितेने शनिवार, ३१ रोजी सकाळी तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली. याबाबत नरडाणा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्या माजी नगरसेवक देवेंद्र सोनार यांची पत्नी तर माजी महापौर चंद्रकांत सोनार यांची स्नुषा आहे. दुचाकीजवळ मिळून आलेल्या आधार कार्डवरून त्यांची ओळख पटली.
शिरपूर तालुक्यातील सावळदे पुलावर शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास एक दुचाकी वाहन उभे असल्याचे आढळून आले. यावरून कोणीतरी अज्ञाताने तापी नदीत उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी नदीपात्रात शोध घेतला असता एका महिलेचा मृतदेह आढळून आला. यावेळी काही मच्छीमारांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. याबाबत नरडाणा पोलिसात कळविल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी नरडाणा रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर येथील हिरे वैद्यकीय रुग्णालयात शवविच्छदेनासाठी मृतदेह सायंकाळी उशिरापर्यंत दाखल होणार होता.
घटनेची माहिती कळताच भाजपा पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळांकडे तर काहींनी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान संबंधित मृत विवाहित महिलेच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याप्रकरणी नरडाणा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विवाहितेच्या मृत्यूची माहिती मिळताच जुनेधुळे परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
बिबट्याच्या हल्ल्यात म्हशीचे पारड्डू ठार
साक्री तालुक्यातील कासारे येथील शेतातील गोठ्यात बिबट्याने हल्ला करून म्हशीचे पारडू ठार केल्याची घटना शुक्रवारी घडली. यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. कासारे येथील शेतकरी नितीन सोमनाथ देसले यांच्या शेतात गुरांचा गोठा बांधलेला होता. त्यात ३० रोजी बिबट्याने म्हशीचे पारडू वर हल्ला करत ठार केले. त्यांनी लगेच पिंपळनेर येथील वन विभागाशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली असता यावेळी वन विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. तसेच शासनाच्या नियमानुसार झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी देसले यांनी केली आहे.