धुळे : वाघाडी (ता. शिरपूर) येथील जवानाला दरीत पडल्याने वीरमरण आले. ही घटना तीन दिवसांपूर्वी सिक्कीम येथे घडली. त्यामुळे वाघाडी गावात शोककळा पसरली. मनोज माळी (२४ रा. वाघाडी) असे मयत जवानाचे नाव आहे. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनोज माळी हे शिक्षण घेत असताना देशसेवा करण्याचे मनात ठाणले होते. दहावीनंतर त्यांनी सैन्य भरती मारली. चार वर्षांपूर्वी ते सैन्यात भरती झाले. तेव्हापासून देशसेवा करणे सुरू होते. सिक्कीम येथे एका ओपी पोस्टवर कार्यरत असताना अन्य जवानांसोबत मार्गस्थ होत असताना मनोज हे दरीत पडले. यात त्यांना वीरमरण आले.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या वाघाडी येथे आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी धुळे जिल्हा पोलीस तसेच भारतीय सैन्य दलाच्या वतीने बंदुकीच्या 21 फैरी हवेत झाडून मनोज माळी यांना मानवंदना देण्यात आली.