Dhule News : ॲडमिशनसाठी बाहेर गावी गेले अन् इकडे चोरट्यांनी साधली संधी, नऊ लाखांचा मुद्देमाल घेऊन पसार

Dhule Crime News : दोंडाईच्या देशमुखनगरातील प्लॉट क्रमांक २२ मध्ये चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. यात जवळपास नऊ लाखांचा मुद्देमाल घेऊन फरारी झाले. दोंडाईचा शहरात वेळोवेळी होणाऱ्या धाडसी चोरीच्या प्रकाराने दोंडाईचा शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील देशमुखनगरमध्ये प्लॉट क्रमांक २२ मध्ये सविता प्रभाकर शिंदे वास्तव्यास आहेत. आपल्या मुलांच्या ॲडमिशनसाठी पुण्याला गेल्या असता घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडत आत प्रवेश केला असून, कपाट तोडले आहे. सर्व सामान अस्ताव्यस्त केले आहे.

शेजारील रहिवाशांनी खिडकी उघडी असल्याचे दिसले. त्यानंतर दरवाजा तोडला असल्याचे लक्षात येताच निमगूळ येथे कळविण्यात आले. कांतिलाल शिंदे, निनाद शिंदे, किशोर शिंदे तातडीने घराकडे रवाना झाले, तसेच पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली. त्यानुसार तातडीने पोलिस उपनिरीक्षक शरद लेंडे पोलिस कर्मचाऱ्यांसह दखल झाले. धुळ्याहून श्वानपथक पाचारण करण्यात आले.

त्यांच्या कॉलेजच्या मोकळ्या जागेपर्यंत गेल्याचे कळते, तसेच ठसेतज्ज्ञ विनोद खरात, धनंजय मोरे, प्रशांत माळे, प्रकाश भावसार यांनी ठसे घेतले, त्यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार मंगलपोत, दोन अंगठ्या, दोन चेन, नऊ तोळे सोने गेल्याचे सांगितले.

आजच्या बाजारभावानुसार नऊ लाखांचा मुद्देमाल गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, सविता शिंदे पुण्याहून निघाल्या आहेत. त्या उशिरापर्यंत घरी आल्यानंतर अधिक ठोस माहिती मिळणार असून, त्यानंतर उशिरा गुन्हा दाखल करण्यात येईल.