धुळे : जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने सर्व संबंधित विभागप्रमुखांची उष्मालाट व्यवस्थापन संदर्भात पूर्वतयारी बैठक १५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.
आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात व रुग्णालयामध्ये कुलवार्ड तयार करावे. रुग्णालयांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या लोकांसाठी खाटांची उपलब्धता करावी, पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना चांगले उपचार देण्यात यावे. ज्या लोकांना घरात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सोय नाही, त्यांच्यासाठी तात्पुरती निवारा केंद्रे उभारावी. उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत पोहोचवण्यासाठी पथके तयार ठेवावीत. बाजार, प्रमुख कार्यालये, बस स्टँड, टॅक्सी स्टैंड, रिक्षा स्टँड आदी ठिकाणी पुरेशी सावलीची व्यवस्था करावी तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करावी. पंखा/कुलर नादुरुस्त असल्यास दुरुस्त करावे. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रथमोपचार पेट्या ठेवाव्यात आणि त्याच्या वापराबाबत आवश्यक सूचना लिहाव्यात. बस स्थानकावर पाण्याची सोय, पंखे सुस्थितीत असावे. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे, आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
उष्णतेची लाट रोखण्यासाठी पूर्वतयारी
निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे यांनी उष्णतेची लाट रोखण्यासाठी करावयाची पूर्वतयारी, जनतेने उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, ज्येष्ठ नागरिक, लहान बालके यांची आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले. राजेश भोसले यांनी उष्णतेच्या लाटेसंदर्भातील परिभाषा, पूर्वसूचना, निकष, पूर्वानुमान याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.