उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात गुरुवारी मोठा रेल्वे अपघात झाला. दुपारी 3 च्या सुमारास दिब्रुगड एक्स्प्रेसचे (15904) सुमारे 12 डबे रुळावरून घसरले. ही एक्स्प्रेस ट्रेन चंदीगडहून दिब्रुगडला जात असताना हा अपघात झाला. जिल्ह्यातील जिलाही आणि मोतीगंज रेल्वे स्थानकाच्या तीन किलोमीटर दरम्यान हा अपघात झाला. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या अपघातात आतापर्यंत चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 27 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही गोंडा येथील दिब्रुगड रेल्वे अपघाताची दखल घेतली आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य त्वरीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्याचे आणि त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही सीएम योगी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सीएम कार्यालयाने ट्विट केले की, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना उत्तर प्रदेशातील दिब्रुगड-चंदीगड एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याच्या घटनेची माहिती देण्यात आली आहे. ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि आसाम सरकार संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. मदतकार्याला गती देण्यासाठी लखनौ, बलरामपूर, श्रावस्ती आणि सिद्धार्थनगर येथून चार एसडीआरएफ टीम गोंडा येथे पाठवण्यात आल्या आहेत. गोंडा पोलिसांसह रेल्वे पोलिस दलही घटनास्थळी हजर असून मदतकार्यात गुंतले आहे.