अजितदादांनी केला होता रोहित पवारांना पाडायचा प्रयत्न?

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा विराधीपक्ष नेते अजित पवार यांनी एका निवडणुकीत त्यांच्याच पक्षाचे आमदार रोहित पवार यांना पाडण्याचा प्रयत्न केला होता, असा गौप्यस्पोट ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. तसेच पवार कुटुंबातच मतभेद असल्याचा मोठा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे.

जानेवारी महिन्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक झाली होती. यामध्ये रोहित पवार निवडून आले होते. मात्र, आता या निवडणुकीवरून राजकारण पेटण्याची चिन्ह आहेत. पवार फॅमिलितील कोणती व्यक्ती रोहित पवार यांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते, अजित पवार साहेब, आधी आपले घरातले बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा, असा पलटवार म्हस्के यांनी केला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार उभे होते. त्यांना पाडण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केल्याचा आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे.

आधी स्वतः च्या पक्षामधे एकमत करा की, भावी मुख्यमंत्री उमेदवार कोण आणि मग इतरांवर टीका करा. अजित दादांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावला जातो. जयंत पाटील यांचा बॅनर लावला गेला, सुप्रिया सुळे यांचा पण लावला गेला नक्की तीन तीन मुख्यमंत्री करणार आहेत का, असा खोचक सवाल नरेश म्हस्के यांनी केला.