जळगाव : कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी आज (सोमवार) चक्क शासकीय विश्रामगृहात एकत्र स्नेहभोजन घेतल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
जिल्हा नियोजन मंडळाची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या आधी एकनाथराव खडसे यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची त्यांच्या अँटी चेंबरमध्ये बराच वेळ भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, आमदार सुरेश भोळे यांसारखी मंडळीही तिथे जमली. त्यानंतर या नेत्यांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला.
हेही वाचा : Extramarital Affairs News : दारु पाजली अन् नवऱ्याच्या छातीवर बसली; असे फुटले बिंग!
नेमकी चर्चा काय झाली?
गुलाबराव पाटील आणि एकनाथराव खडसे यांची बंद दाराआड झालेली चर्चा आणि नंतर एकत्र भोजन यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत जिल्हा नियोजनासंदर्भातील विषय चर्चिले गेले की काही राजकीय डावपेच योजले गेले, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा : OYO रुम बुक करून जोडपं करायचं ‘हे’ कांड, पाहून पोलिसही चक्रावले!
राजकीय वर्तुळात चर्चा
या दोन नेत्यांमधील कट्टर विरोधाची छटा जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय घटनाक्रमात दिसून येत असताना, अशा प्रकारे त्यांचे एकत्र येणे हे आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचे संकेत देत असल्याचे मानले जात आहे. काही राजकीय निरीक्षकांच्या मते, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांमध्ये एक सामंजस्याचा सूर जुळवला जात आहे का, यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
गुलाबराव पाटील म्हणाले?
“भोजन ही केवळ एक औपचारिक गोष्ट होती. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व नेते एकत्र यायला हवे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
एकनाथ खडसे यांची भूमिका
“प्रत्येक विकासकामावर चर्चा करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. यात राजकीय रंग शोधणे टाळावे,” असे खडसे यांनी नमूद केले.