दुर्लक्षित वनस्पतीपासून नवीन तीन प्रथिनांचा शोध 

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२३ । निसर्ग हा मानवजातीचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. याच निसर्गात हालचाल करू न शकणारा बहुपेशीय सजीव म्हणजे वनस्पतींमध्ये होय. यात प्रामुख्याने झाडे, झुडपे, वेली, शेवाळे व कवक यांचा समावेश होतो. आपल्या सभोवताली आपल्याला अनेक प्रकारच्या वनस्पती बघावयास मिळतात. त्यात काही मानवजातीला रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोगी असतात तर काहींचा क्वचितच उपयोग होतो. काही सावली देणाऱ्या असतात, काही वनस्पती फळे, फुले देतात तर काही काटेरी असतात पण प्रत्येक वनस्पतींचे आपापले वेगळेच महत्त्व आहे, अश्याच एका दुर्लक्षित वनस्पतीचा डॉ. शामकांत बडगुजर यांनी नावीन्यपूर्ण संशोधन करून तीन नवीन प्रथिनांचा शोध लावला आहे.

आपण प्रवास करत असताना बसच्या खिडकीतून सहजच आपल्या नजरेस पडते, कधी कुठे माळरानावर असते, कधी शेताच्या बांधावर आपल्याला दिसते, कधी आपण तिचा उपयोग कुंपण म्हणून करतो. आपण सर्व सामान्य मराठी भाषेत तिला ‘साबर‘ किंवा ‘साबरकाण्डा‘ म्हणतो. तिचे शास्त्रीय नाव Euphorbia nivulia (इफोर्बीया निव्हुलिया) आहे आणि ति Euphorbiaceae (इफोर्बीयासी) कुळातील आहे. अगदी संपूर्ण काट्यानी भरलेली, क्वचितच आपल्याला पाने आणि फुले पाहावयास मिळतात. कधी आपल्या दैनंदिन जीवनात तिचा उपयोग होत नाही. कधीतरी जुन्या काळात आपल्या आजी आजोबानी या वनस्पतीची फांदी राखेत भाजून तिचा अर्क आपल्याला दिला असेल तेव्हा याने खोकला लवकर बारा होण्यास मदत मिळत असे. म्हणायला गेल्यास आपल्या आयुष्यात ही एक प्रकारची दुर्लक्षित वनस्पती आहे. याच दुर्लक्षित वनस्पती पासून डॉ. शामकांत बडगुजर यांनी संपूर्ण जगाला माहीत नसलेल्या तीन प्राथिनाची ओळख करून दिली.

EUPHORBIA NIVULIA Buch.-Ham. – pryšec / mliečnik | BOTANY.cz

या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या प्रत्येक भागातून पांढरा द्रवरूप पदार्थ बाहेर येतो. त्याला लॅटेक्स (Latex) असे म्हणतात. डॉ. शामकांत यांनी याच वनस्पतीच्या लॅटेक्सवर नावीन्यपूर्ण संशोधन करून तीन नवीन प्रथिनांचा शोध लावला. विशेष म्हणजे त्यांनी यांना नावे पण दिली. ज्याप्रमाणे आपण भारतात राहतो म्हणून आपण भारतीय आहोत. अगदी त्याच प्रमाणे प्रथिनांचा इफोर्बीया निव्हुलिया या वनस्पतीपासून शोध लागला म्हणून डॉ. शामकांत यांनी या प्राथिनांची नावे निव्हुलियन-१, निव्हुलियन-२ आणि निव्हुलियन-३ असे ठेवलेत आणि ही नावे पूर्ण विश्वाने सुद्धा मान्य केलीत. या संदर्भात डॉ. शामकांत यांचा एक शोध निबंध आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित आहे. या शोध निबंधाचे शीर्षक ‘आयडेंटीफीकेशन अँड क्यारेक्टरायझेशन ऑफ इफोर्बीया निव्हुलिया लॅटेक्स प्रोटीन’ आहे. पुढे डॉ. शामकांत यांनी सखोल संशोधन करून निव्हुलियन-२ हे एक प्रकारचे जैविक उत्प्रेरक आहे असे सिद्ध केले.

या संशोधनाच्या आधारावर डॉ. शामकांत यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने वयाच्या २८ व्या वर्षी विद्यावाचस्पती (Ph.D.) देऊन सन्मानित केले. नंतर त्यांनी याचा गाढा अभ्यास करून अमायनो ऍसिड क्रम शोधला व यावर एक शोध निबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित केला. या प्रथिनांचा उपयोग त्यांनी डिटर्जेन्ट आणि लेदर इंडस्ट्री मध्ये कसा होणार तसेच औषध निर्माण शास्त्रात कसा उपयोग होणार यावर संशोधन केले. आणि यावर सुद्धा डॉ. शामकांत यांचा एक शोध निबंध आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित आहे. आता हल्लीच २०२२-२३ मध्ये या प्रथिनांचा अमायनो ऍसिड क्रम अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हेअल्थ (NIH) यांच्या मार्गदर्शनाने सुरु झालेल्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेकनॉलॉजि इन्फॉर्मशन (NCBI) ने P८६८३७ या शीर्षकाखाली प्रकाशित केला आहे. याने या प्रथिनांचे अस्तित्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. अशा या प्रथिनांची ओळख डॉ. शामकांत बडगुजर यांनी संपूर्ण जगासमोर आणून दुर्लक्षित काटेरी झुडुपाचे (साबार) महत्त्व संपूर्ण जगाला सांगितले.