चर्चा तर होणारच… महापौरांनी दिला ५१ हजार रुपयांच्या नोटांचा बुके; ७२ किलोचा केक

जळगाव : वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना कोणी काय द्यावे हा ज्याच्या त्याचा वैयक्तीक प्रश्न असू शकतो. राजकारणातील विरोधकही ऐकमेकांना विविध प्रसंगी शुभेच्छा देत असतात. त्यात गैर असे काही नाही. विधान परिषदेच्या अधिवेशानाच्या पुर्वसंध्येलाही विरोधकांना चहापानाला सत्ताधारी आर्वजून बोलवत असतात. परंतू दुसऱ्या पक्षातील नेत्याच्या वाढदिवसाला चक्क पाचशे रुपयांच्या 51 हजार नोटांचा बुके दिला तर त्याची चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही.

त्याचे झाले असे की जळगाव महानगरपालिकेतील ठाकरे गटाच्या महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्ष नेते सुनिल महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांना वाढदिवशी फुलांचा नव्हे तर चक्क भारतीय चलनातील पाचशे रूपयांच्या 51 हजार नोटांचा बुके तयार करून तो भेट म्हणून दिला. आमदार खडसे यांनीही तो बुके प्रेमपुर्वक स्विकारत महापौर व विरोधी पक्षनेत्यांना भरभरून आशीर्वादही दिलेत. त्याचे फोटो सेशनही झाले आणि व्हिडीओही सोशल मीडियावर प्रसारीत झाले आहेत. यासोबत महापौरांनी आ. खडसे यांना 72 किलो वजनाचा केकही भेट दिला.

याबाबत विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांनीही आ. खडसे यांना समाजसेवेसाठी फुलाची पाकळी म्हणून त्यांना हे पैसे दिल्याचे सांगीतले.

म्हणून चर्चा…

पुर्वी भाजप व शिवसेना यांची युती होती. ही युती तुटल्याचे जाहीर करण्याची जबाबदारी त्यावेळी भाजपने आ. खडसे याच्यावर दिली होती. पक्ष्ाादेशानुसार खडसे यांनी भाजपा व शिवसेनेची युती तुटल्याचे जाहीर केले. यावरून या दोन्ही पक्ष्ाात मोठे वादळ उठले होते. त्यामुळे आ. खडसे यांच्या बाबत त्यावेळी विविध आरोपही तत्कालीन शिवसेनेकडून झाले होते.

मात्र बदलणाऱ्या काळाबरोबर खडसेंनाही भाजपा सोडून राष्ट्रवादीत यावे लागले. बदललेल्या राजकारणानुसार शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी असे तीन पक्ष मिळून आघाडी तयार झाली आणि एकेकाळी ऐकमेकांचे विरोधक असलेले आता मित्र पक्षात आलेत त्यामुळे ठाकरे गटाच्या महापौरांनी मित्र पक्ष आमदाराला वाढदिवशी नोटांचा बुके देत त्यांना अनोख्या शुभेच्छा दिल्यात. मात्र याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे.