पोटनिवडणुकीवरुन महाविकास आघडीमध्ये बिघाडी

मुंबई : पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक येत्या २७ फेब्रुवारीला होणार आहेत. कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करावी, असा भाजपचा प्रयत्न असला तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने भाजपविरोधात निवडणूक लढविण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. भाजपने पंढरपूर, कोल्हापूर येथे पोटनिवडणूक लढवल्याचा दाखला यावेळी दिला जात आहे. शिवसेनेने काँग्रेसच्या कसबा मतदार संघावर हक्क सांगितल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीतून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने कसबा मतदारसंघासाठी दावा केला आहे. या मतदारसंघात दोनवेळा काँग्रेस उमेदवार विजयी झाला आहे. काँग्रेसकडून काही नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. कसबा मतदार संघावर गेली तीन दशके भाजपचे वर्चस्व आहे. तर दुसरीकडे, लक्ष्मण जगताप हे पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यांनी नंतर भाजपत प्रवेश केला होता. त्यामुळे चिंचवडची जागा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. मात्र, भाजपकडून लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे. तर, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची नावे पुढे येत आहेत.