बीपीएच आणि प्रोस्टेट कर्करोग यांच्यातील फरक ‘असा’ ओळखा

Prostate cancer : प्रोस्टेट कर्करोग (Prostate Cancer) हा पुरुषांना होणारा दुसरा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. प्रोस्टेट कर्करोगाच्या ६०% प्रकरणांचे निदान ६५ किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये झाले असले तरी तरुण पुरुष देखील या आजाराला बळी पडू शकतात. हा कर्करोग पुरुषांमध्ये प्रोस्टेट नावाच्या अक्रोडासारखा आकार असणा-या ग्रंथीमध्ये आढळतो. प्रोस्टेट ग्रंथीतील पेशी नियंत्रणाबाहेर वाढतात किंवा तयार होऊ लागतात तेव्हा प्रोस्टेट कॅन्सर होतो. ज्या पुरुषांच्या रक्तामध्ये प्रोस्टेट-विशिष्ट प्रतिजन किंवा प्रोस्टेट स्फेसिफिक ॲंटिजनचा (पीएसए) स्तर ४ ते १० ng/mL दरम्यान असतो, त्यांच्यातील चारपैकी एकाला प्रोस्टेट कॅन्सर किंवा सौम्य प्रोस्टेटिक हाइपरप्लासिया (बीपीएच) होण्याची शक्यता असते. प्रोस्टेट कर्करोग शोधण्यात पीएसए चांगले कार्य करत असले तरी ते 100% अचूक नाही. अलीकडील ऑपरेशन, शस्त्रक्रिया किंवा आजारामुळे पीएसए पातळी वाढू शकते.

जेव्हा प्रोस्टेट आणि आसपासच्या ऊतींचा विस्तार होतो, तेव्हा त्याला सौम्य प्रोस्टेटिक हायपरप्लासिया (बीपीएच) म्हणतात. बीपीएच निरुपद्रवी आहे, जे सूचित करते की तो कर्करोग नाही किंवा त्याने कर्करोग होत नाही. तथापि, बीपीएच आणि कर्करोग एकाच वेळी होऊ शकतात. बीपीएच आणि प्रोस्टेट कर्करोग यांच्यातील फरक ओळखण्यासाठी डॉ. शामकांत बडगुजर यांनी अलीकडेच सखोल संशोधन करून पीएसए च्या कडेला असलेल्या ग्लाइकन (गॅलेक्टोज आणि सियालिक ऍसिड यांची साखळी) तसेच व्हेक्टर लॅब फ्रान्स येथून घेतलेल्या ग्लाइकन वर आधारित लेक्टिन (MAL-II आणि SNA) चा वापर करून एक नावीन्यपूर्ण पद्धत विकसित केली आहे. प्रोस्टेट कॅन्सर झालेल्या पुरुषांच्या रक्तामध्ये α२-३ साखळी किंवा बंध असतो आणि सर्व सामान्य तसेच बीपीएच झालेल्या पुरुषांच्या रक्तामध्ये α२-६ साखळी असते.

प्रयोग शाळेत पुरुषांच्या रक्ताची चाचणी करतांना SNA ने पीएसए ची ओळख झाली तर तो पुरुष कर्करोगा च्या धोक्याचे बाहेर आहे असे समजावे कारण SNA हा α२-६ ह्या साखळी वर काम करतो. याउलट MAL-II ने पीएसए ची ओळख झाली तर त्या पुरुषाला प्रोस्टेट कर्करोग होण्याचा दाट संभावना असते कारण MAL-II हा α२-३ ह्या साखळी वर काम करतो. अशाप्रकारे आपण बीपीएच आणि प्रोस्टेट कर्करोग यांच्यातील फरक ओळखू शकतो तसेच प्रोस्टेट च्या बायोप्सी चाचणीत होणाऱ्या त्रासापासून आपला बचाव करून घेऊ शकतो आणि वायफळ खर्च करण्यापासून स्वत:ला थांबवू शकतो. डॉ. शामकांत बडगुजर यांनी हा शोध निबंध नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केलेला आहे आणि त्याला परिक्षकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे.