---Advertisement---
जळगाव : गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्योत्सवाचा दर्जा दिला असताना, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हा उत्सव उत्साहात व आनंदाने साजरा करू शकतील यासाठी ऑगस्ट महिन्याचे नियमित वेतन 25 ऑगस्ट पूर्वी वितरित करण्यात यावे अशी मागणी जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच शिक्षण मंत्री दादा भुसे, शिक्षण सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांना जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्यामार्फत उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. तसेच जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्रचे दैवत आणि विद्येची देवता असलेले गणपती बाप्पा यांच्या आगमनाची सर्वत्र तयारी सुरू असून यंदा बुधवार, २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव प्रारंभ होणार आहे. हा उत्सव महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात उत्साहात व श्रद्धापूर्वक साजरा केला जातो. यापार्श्वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्सव कुटुंबासमवेत समाधानाने साजरा करू शकतील, यासाठी वेतन वेळेत मिळणे अत्यावश्यक त्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
शासनाने गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिल्याबद्दल अभिनंद करण्यात आले आहे. तथापि, शिक्षक-शिक्षकेतरांना ऑगस्टचे वेतन आगाऊ मिळणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त केली आहे. तयारीसाठी आर्थिक तरतूद होणे गरजेचे असल्याने माहे ऑगस्ट २०२५ चे वेतन २५ ऑगस्टपूर्वी वितरित करण्याचे आदेश तात्काळ निर्गमीत करण्याची मागणी समन्वय समितीच्यावतीने वतीने करण्यात आली आहे. राज्योत्सवाच्या आनंदात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी ऑगस्टचे वेतन आगाऊ मिळणे गरजेचे असल्याचे समन्वय समितीच्या वतीने पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष गिरीश एस नेमाडे, समन्वयक तुळशीराम सोनवणे, कार्याध्यक्ष पी. ए. पाटील, उपाध्यक्ष गोविंदा पाटील, मार्गदर्शक डॉ. मिलिंद बागुल, डॉ. संजू भटकर, प्रसिद्धीप्रमुख प्रवीण धनगर, महिला प्रतिनिधी सुनिता पाटील, संतोष कचरे, सचिन जंगले, रवींद्र चव्हाण, अनिल मनुरे आदी उपस्थित होते.