धुळे : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत धुळ्यात गुरुवारपासून (१६ जानेवारी) मिनी सरस व जिल्हास्तरीय स्वयंसिद्ध महोत्सव प्रदर्शन व विक्री महोत्सव सुरू होत आहे. हा महोत्सव २० जानेवारीपर्यंत चालणार असून, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन व दर्जेदार उत्पादनांची खरेदी यासाठी हा महोत्सव उत्साहाने पार पडणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिली.
ग्रामीण संस्कृतीचा परिचय
महोत्सव देवपूर परिसरातील वाडीभोकर रस्त्यावरील पंचायत समितीजवळच्या नंदन प्रॉपर्टीजच्या मैदानावर होणार आहे. या प्रदर्शनामध्ये ग्रामीण महिलांच्या हस्तकलेच्या वस्तू, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि विविध उत्पादनांची खासियत शहरी नागरिकांना अनुभवता येणार आहे.
व्हेज-नॉनव्हेज पदार्थांचा आस्वाद
प्रदर्शनात पुरणपोळी, भरीत-भाकरी, ठेचा, तसेच विविध प्रकारचे व्हेज व नॉनव्हेज पदार्थ खवय्यांसाठी उपलब्ध असतील. ग्रामीण भारतातील खाद्यसंस्कृतीचे अस्सल चवदार पदार्थ चाखण्याची ही संधी शहरवासीयांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.
७५ स्टॉल्स आणि दर्जेदार उत्पादने
महोत्सवात नाशिक विभागासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७५ स्टॉल्स लावले जाणार आहेत. यात मिलेट कुकीज, चटणी, लोकरीच्या वस्तू, ज्यूटच्या वस्तू, लाकडी हस्तकला, दागिने, साड्या, ड्रेस मटेरियल, घरगुती मसाले, पापड-कुरडई यांचा समावेश असेल. वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाहीत, तर उच्च दर्जाच्याही आहेत.
ग्रामीण महिलांच्या कलागुणांना संधी
ग्रामीण भागातील महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्याची तसेच शहरी बाजारपेठेचा अनुभव घेण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे. महिलांच्या कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळवून देणे आणि त्यांचा उत्साह वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
समारोप व विशेष आवाहन
या महोत्सवाचा समारोप २० जानेवारी रोजी होणार असून, नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी व ग्रामीण महिलांना पाठबळ द्यावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी केले.
नागरिकांनी या उत्साहपूर्ण महोत्सवाला हजेरी लावून ग्रामीण संस्कृतीचे सौंदर्य व स्वाद अनुभवावे आणि महिला बचत गटांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यावे.