जिल्हा दूध संघ निवडणुकीसाठी १७९ अर्ज

जळगाव : जिल्हा दूध संघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी गुरूवार दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत होती. गुरूवारी ९३ तर मुदतीअखेर आतापर्यंत १७९ उमेदवारांकडून अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दूध संघ निवडणूक कार्यालयात मंत्र्यांसह माजी संचालक तसेच महिला राखीव उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.

जिल्हा दूध संघाच्या निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले असून अनेक दिग्गज पदाधिकार्‍यांसह इच्छुक उमेदवारांकडून गुरूवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली.

यात आ. चिमणराव पाटील व अमोल पाटील यांनी समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपा शिंदे गटाकडून मंत्री गिरीश महाजनांसह अन्य पदाधिकार्‍यांकडून सर्वपक्षीय पॅनलसंदर्भात अजूनही चर्चा सुरू आहे. दरम्यान, सर्वपक्षीय पॅनल करतांना आ. खडसेंच्या संदर्भात कोणत्याही अटी शर्ती बंधने लावू नयेत असे राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी मत व्यक्त केले.

मान्यवरांचे अर्ज

जिल्हा दूध संघाच्या निवडणूकीसाठी गुरूवार अखेर ३६० उमेदवारांनी अर्ज नेले. त्यापैकी १७९ इच्छुक उमेदवारांकडून गुरूवारी दुपारी ३ वाजेच्या मुदतीत अर्ज दाखल करण्यात आले. यात आ. चिमणराव पाटील ४, अमोल चिमणराव पाटील, मंत्री गिरीश महाजन २, आ. मंगेश चव्हाण ३, विनोद तराळ १, जगदीश बढे ३, डॉ.संजीव पाटील, ६, वैशाली पाटील ३, आ.अनिल भाईदास पाटील आणि जयश्री अनिल पाटील प्रत्येकी १, ऍड रविंद्र पाटील २, मालतीबाई सुपडू महाजन ५ असे विविध उमेदवारांसह माजी संचालक इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले. आज होणार अर्जांची छाननी दाखल अर्जांची छाननी शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हा दूध संघाच्या निवडणूक कार्यालयात केली जाणार आहे. तर वैध अर्जाची यादी सोमवार १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होईल. त्यानुसार १४ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. या दरम्यान सर्वपक्षीय पॅनल संमत होते की, मविआ विरूद्ध भाजपा शिंदे गट अशी लढत होणार याकडे राजकीय धुरीणांसह जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.