जळगाव । जळगावात सायबर ठगांकडून होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अशातच आता जळगावातील डॉक्टरला सायबर ठगांनी तब्बल ३१ लाख ५६ हजार ६४ रुपयांमध्ये गंडविले. याबाबत तीन जणांविरुद्ध सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या मोबाइल कानाला लावला म्हणजे सायबर गुन्ह्याच्या संदर्भात प्रभावी जनजागृती करणारी ध्वनिफीत वाजतेय. तरीही अशा घटनांत डॉक्टर, प्राध्यापक, उच्चविद्याविभूषित नाडले जात असल्याचे समोर येते आहे. यातच आता डॉक्टरही सायबर ठगांचे बळी पडले.
व्हॉट्सअॅप मेसेज व व्हिडिओ कॉलने संपर्क करून त्यांच्या नावाने असलेल्या मोबाइलवरून महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवले. त्रास दिल्याबद्दल बांद्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याबाबत अटकेची नोटीस व्हॉट्सअॅपवर पाठवली.
जळगाव शहरातील निवृत्तीनगर, कार्तिक स्वामी मंदिरामागे वास्तव्यास असलेले डॉ. दिगंबर उगले यांना ३१ मार्च रोजी राधिका नावाच्या अनोळखी महिलेने आपण ‘ट्राय’ मधून बोलत आहोत. तुमच्या मोबाइलवरून महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवले आहेत. तुमच्या विरुद्ध बांद्रा पोलिसांत गुन्हा दाखल आहे. तुमच्या बँक खात्यातून मनी लाँड्रिंगचे व्यवहार झाले आहेत. ईडीची नोटीस बजावली आहे, असे सांगून डॉक्टरांना कायद्याने अस्तित्वात नसलेली डिजिटल अरेस्ट करून ३१.५० लाख रुपयात गंडविले.
उगले यांना भामट्यांनी सक्त वसुली (Enforcement Department) विभागाने अटक केलेल्या नरेश गोयल याने तुमचे कॅनरा बँकेचे खाते वापरले. तुम्ही हे खाते नरेश गोयल याच्याकडून २५ लाख रुपये घेऊन त्याला विकले आहे, असेही भामट्यांनी सांगितले.