शरद पवारांचा दहशतवाद्यांना पाठींबा आहे का? नारायण राणेंचा तिखट सवाल

मुंबई : नारायण राणे यांनी शरद पवारांना सवाल केला आहे. नारायण राणे ट्विट करत म्हणाले की, देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्‍यावर आदरणीय शरद पवार यांनी इस्‍त्रायल व हमास लढ्याबाबत केलेली टीका दुर्देवी आहे. दहशतवाद कुणा एका व्‍यक्ती किंवा देशाविरुध्‍द नसून तो माणुसकीच्‍या विरोधात असतो ही देशाची भूमिका आदरणीय मोदीजी जी-20, संयुक्‍त राष्‍ट्रसंघा सारख्‍या व्‍यासपीठांवर मांडत आले आहेत. या धोरणाप्रमाणे त्‍यांनी दहशतवादी हल्‍ल्‍याविरोधी देशाची भूमिका त्यांनी मांडली.

पॅलेस्‍टाईनच्‍या विरोधात नव्‍हे तर दहशतवादाच्‍या विरोधात त्यांनी भूमिका घेतली. देशाच्‍या आजवरच्‍या धोरणाला धरुनच माननीय मोदीजींनी वक्‍तव्‍य केले. दहशतवाद विरोधी भूमिका घेणे चुकीचे आहे असे पवार साहेबांना म्‍हणावयाचे आहे काय? पॅलेस्टिनी आणि दहशतवादी एकच आहेत असे पवार साहेबांना म्‍हणावयाचे आहे काय ? पवार साहेब देशाचे संरक्षण, कृषि मंत्री व महाराष्‍ट्राचे अनेक वेळा मुख्‍यमंत्री होते. मुंबईमध्‍ये 1993 साली झालेल्‍या बॉम्‍ब स्‍फोटांच्‍या वेळी ते मुख्‍यमंत्री होते.

12 बॉम्‍ब स्‍फोट झाले असताना त्‍यांनी तेरावा बॉम्‍ब स्‍फोट मशिदीत झाल्‍याची खोटी माहिती देऊन दहशतवाद्यांना वाचवायचाच प्रयत्‍न केला नव्‍हता काय ? तुष्‍टीकरणाच्‍या धोरणामुळे देशावर आजवर अनेक संकटे आली. आता तरी पवार साहेब तुष्‍टीकरण सोडून देश प्रथम ही भूमिका घेणार आहेत काय ? दहशतवादाने भाजून निघालेल्‍या महाराष्‍ट्रातील जनतेसमोर आता ते कोणता खुलासा करणार आहेत ? असे नारायण राणे म्हणाले.