वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील ६० देशांवर परस्पर आयात कर लागू करण्याची घोषणा केली. यात भारतीय वस्तूंवर २७ टक्के बांगलादेश व चीनवर ३४, श्रीलंका व म्यानमार ४४ तर व्हिएतनामवर ४६ टक्के कर आकारला जाणार असून याची अंमलबजावणी ९ एप्रिलपासून होणार आहे.
ट्रम्प यांनी लादलेले कर शुल्क १९७७ च्या इंटनॅशनल इमर्जेंसी इकॉनॉमिक पॉवर्स अॅक्ट च्या अंतर्गत लागू राहणार आहे. मुक्तिदिनानिमित्त केलेल्या भाषणात ट्रम्प म्हणाले, अमेरिकेची व्यापारी तूट भरून काढण्यासाठी आणि रोजगारनिर्मिती तसेच उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी सर्व देशांवर सरसकट १० टक्के, तर ६० देशांवर परस्पर कर लावण्यात येणार आहे.
ज्यांना करासंदर्भात आक्षेप असेल त्यांनी वस्तूंची निर्मिती आमच्या देशात करावी. त्यांच्यावर आम्ही कुठलाही कर आकारणार नाही. भारताचे पंतप्रधान मोदी माझे मित्र आहे, परंतु भारत अमेरिकेच्या वस्तूंवर ५२ टक्के कर वसूल करतो. त्यामुळे अमेरिकाही भारताकडून २७ टक्के कर वसूल करणार आहे.
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात येमेनमध्ये ६ जण ठार
दुबई : येमेनमधील बंडखोरांच्या नियंत्रणाखालील भागात बुधवारी अमेरिकेच्या संशयास्पद हवाई हल्ल्यात एकूण ६ जण ठार झाले, असे हुथी बंडखोरांनी म्हटले आहे.
दरम्यान, बुधवारी घेतलेल्या व वृत्तसंस्थेने विश्लेषण केलेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये हिंदी महासागरातील डिएगो गार्सिया येथे किमान सहा स्टिल्थ बी-२ स्पिरिट बॉम्बर्स तैनात असल्याचे दिसून आले आहे. येमेन मोहिमेदरम्यान व इराणशी असलेल्या तणावादरम्यान ही एक अत्यंत असामान्य तैनाती आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली येमेनमध्ये सुरू असलेल्या तीव्र हवाई हल्ल्यात बंडखोरांना लक्ष्य केले जात आहे. इस्रायल-हमास युद्धामुळे मध्यपूर्वेच्या पाण्यात जहाजांवर झालेल्या हल्ल्यांत आतापर्यंत किमान ६७ जण ठार झाले आहेत. ही संख्या हुथींनी जाहीर केलेल्या मृतांच्या आकडेवारीनुसार आहे.
ट्रम्प प्रशासनाने पुन्हा एकदा इराण समर्थित हुथी बंडखोरांवरील हवाई हल्ल्यांचा संबंध इराणच्या वेगाने प्रगती करणाऱ्या अणुकार्यक्रमाबद्दल दबाव आणण्याच्या प्रयत्नाशी जोडला असल्यामुळे ही मोहीम थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आतापर्यंत मोहिमेबद्दल व त्याच्या लक्ष्यांबद्दल कोणतीही माहिती दिली नसली तरी, व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट यांनी मंगळवारी झालेल्या एकूण हल्ल्यांची संख्या २०० पेक्षा जास्त असल्याचे सांगितले.
या हल्ल्यांमुळे इराण कमालीचा कमकुवत झाला आहे. आम्ही हुथी नेत्यांना ठार मारले आहे. तसेच नौदल व व्यावसायिक जहाजांवर हल्ले करणाऱ्या महत्त्वाच्या सदस्यांना ठार मारले आहे. या प्रदेशात जलवाहतूक स्वातंत्र्य पुनर्संचयित होईपर्यंत ही कारवाई थांबणार नाही, असे ते म्हणाले. हुथींनी आतापर्यंत त्यांच्या कोणत्याही नेतृत्वाचे नुकसान झाल्याचे मान्य केलेले नाही आणि अमेरिकेने कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव घेतलेले नाही.